भुसावळ – प्लंबर लायसन्स नूतनीकरणासाठी तडजोडीअंती सहाशे रुपयांची लाच स्वीकारताना भुसावळ पालिकेच्या पाणीपुरवठा अभियंत्यासह पाणीपुरवठा विभागातील अन्य दोन कर्मचार्यांना जळगाव एसीबीने बुधवारी सायंकाळी अटक केली होती. लाचखोरांना दुसर्या दिवशी गुरुवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्यांची कारागृहात रवागनी करण्यात आली.

संशयीताची कोठडीत रवानगी
46 वर्षीय प्लंबरने लायसन्स नुतनीकरणासाठी पाणीपुरवठा विभागात संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडे तडजोडी अंती 600 रुपयांची लाच मागण्यात आली. एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणी अंती पाणीपुरवठा अभियंता सतीश सुरेशराव देशमुख, लिपिक शांताराम उखर्डू सुरवाडे (57) व शाम समाधान साबळे (28) यांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. संशयीतांना गुरुवारी दुपारी भुसावळातील अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता एसीबीतर्फे दोन दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली तर संशयीताच्या वकिलांनी पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचा युक्तीवाद केला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने संशयीताना न्यायालयीन कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड.मोहन देशपांडे तर संशयीतांतर्फे अॅड.तुषार पाटील व अॅड.मनीष सेवलानी यांनी बाजू मांडली. एसीबीतर्फे तपासाधिकारी पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव उपस्थित होत्या.


