मुक्ताईनगर (प्रतिनिधी )-
मुक्ताईनगर तालुक्यातील काही नागरिक व तरुण शिक्षणाकरीता व रोजगाराच्या निमित्ताने मुंबई व पुणे येथे गेले होते .तिथे कोरोना विषाणूं चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने या सर्वांनी गावाकडे धाव घेतली आहे . या पार्श्वभूमीवर दि २१ मार्च रोजी पुणे व मुंबई येथून आलेले तालुक्यातील कोठे, लोहारखेडा व मुंढोळदे येथे जाणाऱ्या काही नागरिकांसह युवकांनी स्वत:हुन खबरदारी म्हणून येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड19 विलगीकरण कक्षात तपासणी करुन घेतली .
सदर विलगीकरण कक्षात प्राथमिक तपासणी करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ योगेश राणे , वैद्यकीय अधिकारी डॉ नम्रता अच्छा, डॉ निकिता मराठे,अधिपरीचारक संतोष देशमुख, प्रदीप काळे तसेच सर्व उपजिल्हा रुग्णालयाच्या पारीचारिका कर्तव्य बजावीत आहेत .
आ .चंद्रकांत पाटील यांची समय सुचकता ; उपजिल्हा रुग्णालयात कोविड 19 विलगीकरण कक्ष स्थापित ;;
कोरोनाचे वाढते थैमान लक्षात घेवून प्रादुर्भाव रोखण्याकरिता उपजिल्हा रुग्णालयात कोविड 19 विलगीकरण कक्ष स्थापन
करण्याचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी
सूचना केल्या होत्या.
राज्यातील पहिली आढावा बैठक घेण्यात आली तेव्हा त्वरीत येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड19 विलगीकरण कक्षाची स्थापना करण्याच्या सूचना आ पाटिल यांनी केल्या होत्या .त्यानुसार राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी आ पाटिल यांनी चर्चा करीत कोविड 19 विलगीकरण कक्षात महत्वपूर्ण तपासणी साहित्य सुद्धा मागवून घेतले होते . आ.पाटिल यांच्या समयसूचकतेमुळे आज येथे पुणे , मुंबई तसेच परदेशातून येणाऱ्या नागरिकांची कोरोना संसर्गजन्य तपासणी करणे सोयीचे झालेले आहे . व तपासणी करणाऱ्या आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्याही आरोग्याची सुरक्षितता दिसून येत आहे .यामुळे तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे .



