जळगावात नाकाबंदी दरम्यान कारमधून 64 लाखांची रोकड जप्त –

जळगाव : जिल्ह्यात विधानसभा निवडणूक अनुषंगाने सातत्याने रोकड जप्तीच्या घटना समोर येत आहेत. जळगावातही गुरुवारी तब्बल 64 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. आकाशवाणी चौकात नाकाबंदीदरम्यान भरारी पथकाने एका कारमधून 63 लाख 68 हजार 948 रुपयांची रोकड जप्त केली. या कारवाईने पुन्हा खळबळ उडाली आहे.
जळगाव शहर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी यांनी ही माहिती दिली. भरारी पथकाला संशयित कारबाबत भ्रमणध्वनीवरून माहिती प्राप्त झाली. आकाशवाणी चौकात कार (एम.एच.19 ई.ए.9173) ची तपासणी केली असता त्यात राकेश ए.जैन (नयनतारा अपार्टमेंट, कलाभवन समोर, सिंधी कॉलनी रस्ता) यांच्याकडे 63 लाख 68 हजार 948 रुपयांची रोकड आढळली.

या रकमेबाबत इएसएमएस प्रणालीनुसार जिल्हा तक्रार निवारण समितीसमोर पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात आली. जप्त करण्यात आलेली रक्कम लोखंडी पेटीत सीलबंद करून कोषागारात जमा करण्यात आली. संबंधितांना या प्रकरणी आयकर विभागाकडून नोटीस देण्यात येणार आहे. त्यांना रकमेबाबत हिशेब द्यावा लागेल, अशी माहिती निवडणूक विभागाच्या माध्यमातून देण्यात आली.