जळगावात वाघाची कातडी विक्रीसाठी आणलेल्या सहा जणांना अटक


जळगाव : जळगांव तालुक्यातील नशिराबाद टोल नाक्याजवळ वाघाची कातडी विकण्यात येणार असल्याची माहिती पुणे व जळगाव कस्टमर अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या कारवाई करत सहा संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून वाघाच्या कातडीसह दोन मोटरसायकली, पाच मोबाईल जप्त करण्यात आले. पुढील कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी जळगांव प्रादेशिक हे करत आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी, जळगावात वाघाची कातडी विक्रीसाठी आणण्यात येणार असल्याची माहिती गुप्त माहितीदाराकडून मिळाली. त्यानुसार पुणे व जळगांव कस्टम अधिकाऱ्यांनी जळगाव तालुक्यातील नशिराबाद टोल नाक्याजवळ सापळा रचून वाघाच्या कातडीसह अजवर सुजात भोसले (वय ३५ रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर) मोहमंद अतहर खान ( वय ५८, रा. भोपाल जि. भोपाल (मध्यप्रदेश), नदीम गयासुद्दीन शेख (वय २६, रा. अहमदनगर जि. अहमदनगर, ककंगनाबाई अजवर भोसले (वय ३०, रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर जि. जळगांव, तेवाबाई रहीम पवार (वय ३५, रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर जि. जळगांव, रहिम रफिक पवार (वय ४०, रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर जि. जळगांव) यांना अटक केली. त्यांच्याकडून ५ मोबाईलसह २ मोटरसायकली ताब्यात घेण्यात आले.

वाघाची शिकार कुठे झाली? आणि वाघाची कातडी कोणाला विकली जाणार होती? याचा तपास सुरू आहे. सत्यता तपासण्यासाठी त्वचेचे नमुने प्रयोगशाळेत पाठवायचे आहेत. प्राथमिक माहिती च्या आधारे वाघाची मध्यप्रदेशात शिकार केल्याचा अंदाज आहे, त्यामुळे या वाघ शिकार प्रकरणाच्या तपासाबाबत उपवनसरंक्षक जळगाव प्रवीण ए. हे मध्य प्रदेश वन विभाग आणि सीमाशुल्क विभागाच्या संपर्कात आहेत. याप्रकरणी वनविभागाकडून पुढील चौकशी सुरू आहे.