केंद्रस्तर शिक्षण परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांच्या सक्षमीकरणावर भर – डायट प्राचार्य डॉ. अनिल झोपे : वर्षभरातील शिक्षण परिषदांमधील विषयांचे केले नियोजन :

जळगाव – बालकांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक विविध कार्यक्रम व उपक्रमांची काटेकोर अंमलबजावणी करून ते थेट बालकांपर्यंत उत्तम रीतीने पोहोचवावे त्याची आणि त्याद्वारे आलेल्या निष्कर्षांच्या आधारे कृतिकार्यक्रमांची आखणी करून त्याची अंमलबजावणी करावी. त्यामुळे बालकांच्या गुणवत्तावाढीस हातभार लागेल. त्यासाठी केंद्रस्तर शिक्षण परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांच्या सक्षमीकरणावर भर दिला जात असल्याचे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी केले.

केंद्र संसाधन गट सक्षमीकरण व शिक्षण परिषद पूर्व नियोजन कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी वेवोतोलू केझो, डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. चंद्रकांत साळुंखे, डॉ. जगन्नाथ दरंदले, डॉ. कविता चव्हाण, डॉ. संगीता पाटील यांच्यासह ग्यानप्रकाश फाऊंडेशनचे संभाजी रोडे, सागर धनेधर, डॉ. जगदीश पाटील उपस्थित होते. प्रारंभी ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. चंद्रकांत साळुंखे यांनी केंद्रस्तर सक्षमीकरण व भूमिका या विषयावर बोलताना केंद्रात नाविन्यपूर्ण व कृतियुक्त शैक्षणिक वातावरण निर्माण करून शिक्षकांच्या शैक्षणिक विचारांची देवाणघेवाण होणे गरजेचे असल्याचे सांगितले. अधिव्याख्याता डॉ. संगीता पाटील यांनी शिक्षण परिषद नियोजन व कार्यवाही याविषयी माहिती देऊन वर्षभरातील शिक्षण परिषदांमध्ये घ्यावयाच्या विविध विषयांवर चर्चा केली व जुलै महिन्यातील शिक्षण परिषदेमध्ये घेण्यात येणाऱ्या विषयांबाबत मार्गदर्शन केले. अधिव्याख्याता डॉ. कविता चव्हाण यांनी लिहिते होऊया या विषयावर बोलताना समग्र शिक्षा अंतर्गत ग्रंथालय उपक्रमात शिक्षकांनी विविध इयत्ता व विषयावर आधारित माहितीचे लेखन करायला हवे असे सांगून यातील निवडक पुस्तकांचे शासनातर्फे प्रकाशन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अधिव्याख्याता डॉ. जगन्नाथ दरंदले यांनी वंचितांचे शिक्षण व नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती या विषयावर बोलताना सामाजिक व आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांना शैक्षणिकदृष्ट्या प्रवाहात आणण्यासाठी व अध्ययन-अध्यापन अधिक दर्जेदार करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावे असे आवाहन केले. ग्यानप्रकाश फाउंडेशनचे संभाजी रोडे यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन व बैठक नियोजन यासंदर्भात माहिती देऊन समितीचे गठन व त्यावर करावयाची कार्यवाही याबाबत मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी वेवोतोलू केझो यांनी सेतू अभ्यासाबाबत जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या संशोधनाविषयी माहिती दिली. कार्यशाळेला डॉ. जगदीश पाटील यांनी तांत्रिक सहाय्य केले. सूत्रसंचालन ग्यानप्रकाश फाऊंडेशनचे सागर धनेधर यांनी तर आभार डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. चंद्रकांत साळुंखे यांनी मानले. ही कार्यशाळा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव, प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद जळगाव व ग्यानप्रकाश फाऊंडेशन पुणे यांच्यातर्फे आयोजित करण्यात आली. कार्यशाळेला जिल्हाभरातील शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, केंद्रस्तर प्रतिनिधी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.