भुसावळातील नवोदय विद्यालयामागे 12 वर्षीय बालकाचा गळा आवळून खून -कुजलेल्या अवस्थेत आढळला होता मृतदेह ः ओळख पटवण्याचे तालुका पोलिसांकडून आवाहन

भुसावळ : भुसावळ शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील नवोदय विद्यालयामागील शेतात 10 ते 12 वर्षीय तरुणाचा नग्न अवस्थेतील कुजलेला मृतदेह गुरुवारी आढळला होता. अनोळखी मुलाचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालाअंती स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात भुसावळ तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
साकेगाव शिवारातील नवोदय विद्यालयामागील शेत गट क्रमांक 317/1 मधील दक्षिण बांधालगत 10 ते 12 वर्षीय मुलाचा कुजलेला व नग्न अवस्थेतील मृतदेह गुरुवारी आढळला होता. मृतदेहाशेजारीच गुलाबी व काळ्या रंगाची पानांची डिझाईन असलेला फुल बाहिचा शर्ट तसेच निळ्या रंगाची फुल पॅन्ट आढळली होती. पोलिसांना खुनाची माहिती कळताच पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, तालुक्याचे निरीक्षक महेश गायकवाड आदींनी धाव घेतली होती. सुरूवातीला या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती मात्र शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर त्यात अनोळखीचा गळा आवळल्याचे स्पष्ट झाल्याने तालुका पोलिसात याप्रकरणी हवालदार संजय भोई यांच्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला. 10 ते 12 वर्षीय बालक नेमका रहिवासी ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जिल्ह्यातील ठाण्यांमध्ये अपहरण झालेल्या व हरवलेल्या 10 ते 12 वयोगटातील मुलांची माहिती मागितली आहे. त्यावरून मृताची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अधिक तपास भुसावळ तालुक्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड करीत आहेत.