अशीही विठ्ठलभक्ती : भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या सायकलपटूंनी सायकलवर गाठली पंढरी”

भुसावळ –
आषाढ महिना म्हटला की अगदी एक महिना आधीपासूनच संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले विठोबा माउली व माय रखमाई यांच्या दर्शनाची आस संपूर्ण महाराष्ट्राला लागते. काही वारकरी, टाळकरी व भाविक अगदी एक दीड महिन्यापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पायी दिंडी वारी काढून विठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात दाखल होत असतात. तर काही भाविक इतर माध्यम वापरून पंढरपुरात दाखल होत असतात. परंतु प्रत्येकाचा भक्तिभाव हा एकच असतो की विठुरायाच्या चरणी लीन होऊन आपले दुःख, आपल्या समस्या विठुरायाला सांगून भक्तिरसात न्हाऊन निघावे.
या वर्षी भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या सायकलपटूंनी एक आगळीवेगळी भक्तीची वाट संपूर्ण भुसावळ शहरासाठी व जिल्ह्यासाठी दाखवून दिली. औचित्य होते पंढरपुरात विठ्ठल रखूमाईचे दर्शन घेणे. परंतु या सर्व सायकलपटूंनी यावेळी ठरवलं की कुठल्याही वाहनाने न जाता आपण सायकलने ही पंढरपूरची वारी करायची. भुसावळहुन तब्बल ४७० किलोमीटरचे अंतर सायकल चालवून त्यांनी पंढरपूर गाठले. यासाठी सतत दोन दिवस उन, वारा, पाऊस याची कसलीही तमा न बाळगता या ११ सायकलवीरांनी भुसावळहुन निघाल्यानंतर जामनेर, पहूरमार्गे बीड व तेथून सोलापूरमार्गे पंढरपूर गाठले. रस्त्यात ठिकठिकाणी असंख्य नागरिकांनी या सायकलवारीचे विशेष कौतुक केले व त्यांच्या ठायी असलेला भक्तिभाव बघून त्यांचे स्वागत व अभिनंदन केले.
पंढरपुरात दाखल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या इतर सायकलपटूसोबत गोल रिंगण करून जणू हा सायकलविरांचा महामेळावा आहे असे चित्र त्याठिकाणी निर्माण झाले. या सायकल वारीमध्ये भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन चे प्रमुख प्रविण फालक यांच्या व विद्याधर इंगळे, यांच्या नेतृत्वात मधुकर इंगळे, गजानन पाटील, मनोज चौधरी, तुषार पोतरवार, युवराज सूर्यवंशी, भाऊसाहेब पाटील, रविकांत पवार, जगदीश रेहपाडे, सोमनाथ जाधव यांनी या सायकल वारीमध्ये यशस्वीपणे सहभाग नोंदविला. या सायकल वारीचे वैशिष्ट म्हणजे या सायकलवारीसाठी १५ दिवस आधीपासूनच नियोजन सुरू होते. या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी विद्याधर इंगळे व मनोज चौधरी यांनी लिलया पार पडली. त्यामध्ये इतक्या लांब पल्ल्याच्या अंतरात कुठे थांबायचे, कुठे नाश्ता, चहा व जेवणाची व्यवस्था करायची आदी सगळ्या गोष्टींचा समावेश होता. त्यानंतर पंढरपुरात दाखल झाल्यानंतर निवासाची व्यवस्था कुठे असेल व दर्शनाची व्यवस्था कशी असेल याची देखील जबाबदारी त्यांनी पार पाडली.
भुसावळ येथून विठ्ठल मंदिर वार्डातील विठ्ठल मंदिरापासून सुरू झालेल्या या सायकल वारीला विठ्ठल मंदिर व्यवस्थापन समितीचे सदस्य गणेश बऱ्हाटे यांनी सुरुवातीला हिरवी झेंडी दाखवून या सुरुवात झाली.

यावेळी सायकलपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी गणसिंग पाटील, विजय फिरके, डॉ. जगदीश अत्तरदे, तेजस चौधरी,राजेंद्र ठाकूर, प्रमोद शुक्ला, जितेंद्र चौधरी, स्वाती फालक, अर्चना भगत, प्रवीण पाटील आदी सदस्य उपस्थित होते.