भुसावळातून विशेष रेल्वेने हजारो वारकरी रेल्वेने पंढरपूरला रवाना : मंत्री रक्षा खडसेंनी दाखवली हिरवी झेंडी –

भुसावळ : भुसावळ रेल्वे स्थानकावरून मंगळवार, 16 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजता विशेष रेल्वेने हजारो वारकरी पंढरपूरला रवाना झाले. सालाबादाप्रमाणे खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नातून विशेष रेल्वेचे बुकींग करण्यात आले होते. रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्मवर क्रमांक तीनवर खासदार रक्षा खडसे व भाजपा पदाधिकार्‍यांनी दुपारी 1.35 वाजता विशेष गाडीला हिरवी झेंडी दाखवल्यानंतर ही गाडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.
खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नातून सालाबादाप्रमाणे पंढरपूर वारीसाठी मोफत रेल्वे आरक्षीत करण्यात आली. मंगळवारी दुपारी एक वाजताच भुसावळसह रावेर, यावल, बोदवड, मुक्ताईनगर, जामनेर, मलकापूर आदी भागातील सुमारे दिड हजाराहून अधिक वारकरी रेल्वे स्थानकावर दाखल झाले होते. गाडी निघण्यांपूर्वी वारकर्‍यांनी प्लॅटफार्म क्रमांक तीनवर भजने म्हटल्याने वातावरण भक्तीमय झाले होते. विशेष गाडी बुधवारी पहाटे साडेतीनला पंढरपूरला पोहोचणार असून याचदिवशी रात्री 10.30 वाजता पंढरपूर येथून परतणार आहे.
याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, भाजपा सरचिटणीस परीक्षीत बर्‍हाटे, माजी नगसेवक युवराज लोणारी, अष्टभूजा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन धांडे, अ‍ॅड.बोधराज चौधरी, देवा वाणी, दिनेश नेमाडे, अजय नागराणी, डॉ.कुंदन फेगडे, राहुल तायडे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे आदी उपस्थित होत्या.