यावल : तालुक्यातील दहिगाव येथे राहणाऱ्या तरुणास चुंचाळे फाट्याजवळ गुंगीचे औषध देऊन त्याच्याजवळील सव्वा लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने घेत पोबारा केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहिगाव येथील शेतकरी गिरीश मनोहर महाजन यांनी चुंचाळ्यात येथील शेत मजुरांना मजुरी देण्यासाठी यावलच्या स्टेट बँकेतून ६५ हजार रुपये काढले. मजुरीत पैसे कमी पडत असल्याने त्याचे हातातील पाच ते सहा ग्रॅमची सोन्याची अंगठीसुद्धा त्याने मोडली. सोन्याच्या अंगठीचे पैसे आणि रोख ६५ हजार असे मिळून एक लाखाच्यावर रक्कम त्यांच्याकडे होती. ते दुचाकीने चुंचाळे गावाकडे जात असतांना त्यांना अज्ञात इसमाने दुचाकीवर येऊ दे म्हणून लिफ्ट मागितली.
गिरीश महाजन यांनी त्याला दुचाकीवर बसविले असता चुंचाळे फाट्याजवळील औषधीच्या कारखान्याजवळ एका केळीच्या बागेत ओढून नेऊन गुंगीचे औषध देऊन त्याचेजवळील रक्कम या भामट्याने काढून घेतली. दुचाकी ही केळीच्या बागात लपवुन तो अज्ञात चोरटा पसार झाला. घटनेचा प्रकार लक्षात येताच त्याचे वडील व नातेवाईक त्याचा शोध घेण्यासाठी गेले असता तो या केळीच्या बागेत मिळून आला. या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


