बारा लाखाची लूट करून पसार झालेले चौघे पोलिसांच्या ताब्यात :

भुसावळ, : तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत जामनेर रोडवरील महादेव माळ फाट्याजवळ बुधवारी ता. ३ रोजी दुपारी चौघांनी एका व्यापाऱ्याचे डोक्याला पिस्तूल लावून अंदाजे बारा लाखांची रोकड लंपास केली. ही रक्कम संबंधित तरुण जामनेर येथे घेऊन जात असतांना रस्ता लुटीची घटना घडली होती.याबाबत तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता

या गुन्ह्यातील अनोळखी इसमांचा बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने शोध घेवून गुन्हा उघडकीस आणून चौघांना ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वृत्त असे की, नशिराबाद येथून दुचाकीवर एक तरुण बॅग घेऊन जामनेरच्या दिशेने जात होता. काही अंतर कापल्यानंतर बॅगमध्ये रोकड असल्याची पाळत ठेवून तीन जण दुचाकीवर त्याचा पाठलाग करीत होते.जामनेरकडे जाणाऱ्या महादेव माळ फाट्याजवळ रस्त्यावर दुचाकी आडवी लावून चौघांनी गावठी पिस्तूल त्या तरुणाच्या डोक्याला लावून त्याच्याकडून पैशाची बॅग हिकावली व तेथून दुचाकीने पसार झाले. बॅगमध्ये अंदाजे १२ लाखांची रोकड होती. ही घटना तालुका पोलिस ठाणे हद्दीत घडली.

याबाबत पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी, पोलिस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक नजन किसन पाटील, कर्मचारी, तालुका पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली होती.सदरील घटने संदर्भात पोलिस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशन,तालुका पोलीस स्टेशन,स्थानिक गुन्हे शाखा असे तीन पथके तयार करण्यात आली होती.पथकाने मांडवा दिगर,जामनेर त्याचप्रमाणे जंगल परिसर, भुसावळ असे परिसर पिंजून काढला.अखेर शेवटी सदरील गुन्ह्यातील संशयित आरोपितांची बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या पथकातील उमाकांत पाटील,प्रशांत परदेशी, योगेश माळी, रमण सुरळकर अशांनी मिळून तांत्रिक माहिती तसेच गोपनीय बातमीदाराकडून संकलन करून चौघे संशयितांना झेडटीसी भागातून ताब्यात घेतले यातील दोन संशयित विधिसंघर्ष असल्याने त्यांना बाल न्यायालयात तर दोघे संशयितांना भुसावळ न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

सदरील कारवाई पोलिस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, योगेश माळी, रमण सुरळकर तालुका पोलीस स्टेशनचे प्रेम सपकाळे,दिपक जाधव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नजन किसन पाटील,रणजित जाधव,संजय हिवरकर अशांनी मिळून केली.सदरील रस्ता लूट मधील अंदाजित रक्कम बारा लाखाच्या जवळपास असल्याने पोलिसांनी संशयितांना कडून दहा लाख रुपये हस्तगत करण्यात यश आला आहे.