भुसावळ : शहरातील तापी नदीच्या पुलावरून स्कुटीवर आलेल्या शहरातील 18 वर्षीय तरुणीने अचानक उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने तरुणी पाण्यात पडल्याने बचावली आहे. तरुणीच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने ती बेशूध्द झाली. यावेळी काही जणांनी तिला पाण्यातून वेळीच बाहेर काढल्याने तरुणीचा जीव वाचला. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
तापी नदीच्या पूलावर 18 वर्षीय तरुणी स्कूटीवरून आली. तिने पूलावर स्कुटी उभी करून पूलावर पश्चिमेकडील लोखंडी अँगलवर चढून थेट नदीत उडी मारली मात्र ही तरुणी पाण्यात पडल्याने बचावली. यावेळी तापी नदीजवळ राहणारे अरुण रंधे, अनिल गाढे, पिंटू सरदार, ललित रंधे यांनी तत्काळ नदीत जात पाण्यातून तरुणीला बाहेर काढले. शहर पोलिसांना माहिती मिळताच सहायक फौजदार सय्यद इकबाल, गनी मिर्झा, महिला पोलीस ललिता बारी यांनी नदीवर जात तरुणीला रुग्णवाहिकेतून खासगी हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. तरुणीच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने ती बेशुध्द झाली तर तिच्या कंबरेला मार लागला आहे. तरुणीच्या घरी आई, बहिण असून वडीलांचे 2018 मध्ये निधन झाले आहे. आत्महत्येचा प्रयत्न का केला याचे कारण मात्र पोलिसांच्या जवाबाअंती समोर येणार आहे.



