भुसावळ हे तर “मिनी हिंदुस्तान” ही अभिमानाची बाब – डॉ. महेश्वर रेड्डी

पोलीस दल व शिखर एनजीओच्या सहकार्याने इफ्तार पार्टी साजरी :;

भुसावळ- भुसावळ जंक्शन शहर हे खऱ्या अर्थाने ‘मिनी हिंदुस्तान’ आहे याचे एक नाही अनेक उदाहरणे आहेत. सर्व जाती धर्माचे लोक येथे गुण्या गोविंदाने राहतात. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही जातीय तेढ निर्माण झाले ,अशी घटना शहरात झाली नाही ही अभिमानाची बाब आहे .तसेच नेहमीच भुसावळकरांचे पोलीस प्रशासनाला सहकार्य असते असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी केले.

रिंग रोड येथील शिखर इन्स्टिट्यूट येथे जळगाव जिल्हा पोलीस, भुसावळ उपविभाग व शिखर ऑर्गनायझेशनच्या सहकार्याने आयोजित इफ्तार पार्टीत प्रथमच भुसावळला एका कार्यक्रमात रेड्डी आले यावेळी ते बोलत होते .

प्रसंगी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, डीवायएसपी कृष्णात पिंगळे, तहसीलदार नीता लबडे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन, शहरचे पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन जगताप, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली चव्हाण, गटविकास अधिकारी डॉ. संदीप पानझडेसह हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते.

शहरामध्ये जातीय सलोखा निर्माण व्हावा, भाईचारा रहावा शांतता नांदावी पोलीस कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे याबाबत मार्गदर्शन केले , तसेच लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आचारसंहितेचा कुठलाही भंग होणार नाही याची दक्षता घेत सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असेही आवाहन यावेळेस पोलीस अधीक्षक महेशवर रेड्डी यांनी केले.

ईद आनंदाने साजरी करा

येत्या आठ दिवसांमध्ये रमजान ईद साजरी होणार आहे यात सर्व समाज बांधवांनी एकत्रीत येऊन ईद मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरी करा असेही त्यांनी यावेळी सांगितले .
रोजदारांसाठी अल्पवहाराची व्यवस्था

रोजा इफ्तार पार्टीमध्ये उपस्थित शेकडो रोजदारांसाठी फळ, अल्पोहार, सरबत ,शितपेय आदींची व्यवस्था करण्यात आली होती.शिखर एनजीओ चे अध्यक्ष रफिक शेख व उपाध्यक्ष वासेफ पटेल, जिल्हाध्यक्ष जाकिर शेख, खलील मन्यार ,संजय पाटील, सय्यद मोहम्मद, शकील अली, फहीम शेख ,जुनेद खान, शबिर अहमद, मुजाहिद तडवी साजिद कुरेशी आदींनी परिश्रम घेतले.

सामाजिक कार्यकर्ता मुकेश गुंजाळ यांचाही केला सन्मान

सामाजिक कार्यकर्ते मुकेश गुंजाळ हे दरवर्षी शिवजयंतीची मिरवणूक खडका रोड , जाम मोहल्ला भागातून काढतात मात्र यंदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली आचारसंहिता व मुस्लिम समाज बांधवांचा रमजान महिना असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी असते ही बाब पोलीस प्रशासनाने गुंजाळ यांना सांगितल्यावर त्यांनी लगेच पोलीस प्रशासनास सहकार्य करत शिवजयंतीची मिरवणूक रद्द केली, याकरिता मुकेश गुंजाळ यांचा पोलीस अधीक्षक रेड्डी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.