मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, राम करन यादव यांनी मध्य रेल्वेच्या ९ कर्मचाऱ्यांना म्हणजे मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर विभागातील प्रत्येकी २ आणि भुसावळ विभागातील एका कर्मचाऱ्यांस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दि. ०२.०४.२०२४ रोजी आयोजित कार्यक्रमात सुरक्षा पुरस्काराने सन्मानित केले.

कर्तव्यावर असताना त्यांनी दाखवलेली दक्षता, गेल्या काही महिन्यांत रेल्वेच्या कामकाजात सुरक्षितता सुनिश्चित करण्यात अनुचित घटना रोखण्यात त्यांनी दिलेले योगदान या बद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारामध्ये पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय सुरक्षा कार्यासाठी प्रशस्तीपत्र आणि रोख रुपये २०००/- असे आहे.
मुंबई विभाग
१. श्री विनोद संतोष सपकाळे, सहायक, कोचिंग डेपो, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई विभाग, दि. २१.०३.२०२४ रोजी तपासणी कार्यावर असताना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे, प्लॅटफॉर्म क्र. १२ वर ट्रेन क्र. 11010 ची एलएचबी दुसऱ्या सीटिंग कोच च्या एक्सल बॉक्स क्र. ८ चे तापमान कमी झाल्याचे आढळून आले. मध्य रेल्वे डब्बा क्रं. १९६९३० चे तापमान ९५ अंश सेल्सिअस असल्याचे आढळून आले. सदर डब्बा रेल्वे सेवेसाठी अयोग्य घोषित करण्यात आला आणि त्याच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.
२. श्री शाहिद अन्सारी, कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), कल्याण लोको शेड, मुंबई विभाग, दि. ०२.०३.२०२४ तपासणी कार्यादरम्यान, इंजिन क्रमांक २७११८/डब्लुएजी-७ च्या स्टेट प्लॅटफॉर्मवर एक इंच तडा गेलेला दिसला, जो सामान्यतः उघड्या डोळ्यांनी सहज पाहता येत नाही. व्हिडीओ स्कोपच्या माध्यमातून पाहिल्यावर पाच ते सहा इंचांचा तडा होता. अशाप्रकारे तडा असणाऱ्या मार्गावर इंजिन बिघाड होण्याच्या अनेक घटना घडतात. श्री अन्सारी यांच्या सतर्कता आणि कर्तव्यामुळे एक संभाव्य दुर्घटना रोखण्यास मदत झाली.
नागपूर विभाग
३. श्री विवेक गजभिये स्थानक उपव्यवस्थापक, मांजरी-सी केबिन, नागपूर विभाग, यांनी दि. १८.०२.२०२४ रोजी रात्रीच्या कार्यादरम्यान मांजरी सी केबिन येथे मालगाडीच्या ब्रेक व्हॅनच्या १५ व्या वॅगनमध्ये हॉट एक्सलचे निरीक्षण केले. त्यांनी तात्काळ याची माहिती डेप्युटी स्थानक मॅनेजर/माजरी आणि ट्रेनच्या लोको पायलटला वॉकीटॉकीवर दिली आणि लाल सिग्नल दाखवून ट्रेन मांजरी येथे थांबवली. तपासणी केल्यावर धूर येताना दिसला. नंतर हॉट एक्सल वॅगन ट्रेनपासून वेगळी करण्यात आली आणि संभाव्य अपघात टळला.
४. श्री साहेब हुसेन, स्थानक उपव्यवस्थापक, चिचोडा, नागपूर विभाग, यांनी दि. ०९.०२.२०२४ रोजी रात्री कार्यादरम्यान दारीमेटा स्थानकावर जाणाऱ्या मालगाडीच्या इंजिनमधून ८ व्या वॅगनमधील हॉट एक्सलचे मध्ये बिघाड असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ ट्रेनच्या इंजिन चालक आणि गार्डला माहिती दिली. ९४८/३६ किलोमीटरवर ट्रेन थांबवली होती. तपासाअंती हा हॉट एक्सल असल्याची खात्री झाली, जो अग्निशामक यंत्राच्या साह्याने विझवण्यात आला आणि हॉट एक्सल असलेली वॅगन नरखेड स्थानकात ५ किमी वेगाने नेण्यात आली आणि तेथे वेगळी करण्यात आली, जेणेकरून संभाव्य अपघात टाळण्यास मदत झाली.
पुणे विभाग
५. श्री रोहित पोहेकर, वरिष्ठ विभाग अभियंता, पुणे (सी अन्ड डब्लु), पुणे विभाग, दि. ०२.०३.२०२४ रोजी, ट्रेन क्रमांक १८५२० लोकमान्य टिळक टर्मिनस- विशाखापट्टणम एक्स्प्रेस मुंबई विभागातून ताशी ६० किमी वेगाने एअर स्प्रिंगच्या बिघाडासह धावत होती. पुणे विभागाने विकसित केलेल्या इन-हाऊस तंत्रज्ञानाचा वापर करून कोचमधील एअर स्प्रिंग्समध्ये बदल करण्याचे काम श्री पोहेकर यांच्याकडे सोपविण्यात आले होते. ३ एअर स्प्रिंग्स बदलण्यासाठी ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर नेण्यात आली. श्री पोहेकर यांनी कोचची तपासणी केली आणि ड्युप्लेक्स चेक व्हॉल्व्हमधील लवचिक पाईपमधील गळतीच्या समस्येचे निदान केले. ड्युप्लेक्स चेक व्हॉल्व्ह आणि एफआयबी डिव्हाइस १५ मिनिटांत बदलण्यात आले आणि ट्रेन पुणे येथून सामान्य वेगाने निघाली. त्यांच्या प्रयत्नांमुळे डब्याची सुरक्षितता तर राहिलीच पण ट्रेनचा वक्तशीरपणा राखण्यातही मदत झाली.
६. श्री संतोष भिकाजी, गेटमन, मळवली, पुणे विभाग, दि. १८.०३.२०२४ रोजी गेट क्र. ३६ येथे काम करत असताना, त्यांना ईएमयू लोकलच्या पॅन्टोग्राफमधून एक ठिणगी बाहेर पडताना दिसली आणि संपर्क वायर लटकत असल्याचे दिसले, त्यांनी लगेच आरडाओरडा करून मोटरमनला सावध केले आणि लाल झेंडा दाखवून ट्रेन थांबवली. वेळीच योग्यप्रकारे परिस्थिती हाताळून संभाव्य अपघात टाळला.
सोलापूर विभाग
७ श्री विजय कुमार राम, ट्रॅक मेंटेनर, दौंड, सोलापूर विभाग यांनी दि. १८.०३.२०२४ रोजी १९.५४ वाजता गेट क्रमांक १९ वर गेटमन म्हणून काम करत असताना मालगाडीच्या एका वॅगनमध्ये हॉट एक्सलचे निरीक्षण करताना बिघाड निदर्शनात आला. गाडी ताबडतोब थांबण्याच्या स्थितीत नसल्याने त्यांनी दौंड स्थानकावर गाडी थांबवल्याची माहिती दिली व समस्या दूर करण्यात आली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.
८. जयप्रकाश, स्थानक उपव्यवस्थापक, भिगवण, सोलापूर विभाग दि. २५.०२.२०२४ रोजी कर्तव्यावर असताना, यांच्या लक्षात आले की तेथून जाणाऱ्या मालगाडीच्या तिसऱ्या शेवटच्या वॅगनला आग लागली होती. त्यांनी लगेच लाल सिग्नल दाखवून ट्रेन थांबवली. तपासणी केल्यावर एक हॉट एक्सल सापडला जो दुरुस्त करण्यात आला आणि त्याच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.
भुसावळ विभाग
९. गणेश गाडगे, पॉइंट्समन, नाशिकरोड, भुसावळ विभाग दि. २२.०३.२०२४ रोजी नाशिकरोड स्थानकावरून ११०५५ डाउन गोदान एक्स्प्रेस निघण्यापूर्वी, श्री गाडगे यांनी ट्रेनच्या सामानाच्या डब्यात आग लागलेली पाहिली. त्यांनी तात्काळ सर्व संबंधितांना माहिती देऊन तात्काळ ट्रेन थांबवण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि कामाप्रती समर्पित भावनेमुळे मोठा अपघात टळला.
महाव्यवस्थापकांनी आपल्या भाषणात पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कर्तव्याप्रती सतर्कता आणि समर्पणाबद्दल त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, अशी दक्षता आणि धाडसी कृत्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रामाणिकपणे काम करण्यासाठी इतरांना प्रेरणा देतील.
चित्तरंजन स्वैन, अतिरिक्त महाव्यवस्थापक, एस एस गुप्ता, प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक, एम एस उप्पल, प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी, राजेश अरोरा, प्रधान मुख्य अभियंता सुनील कुमार, प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता, एन पी सिंह, प्रधान मुख्य इलेक्ट्रिकल अभियंता, अवनीश कुमार पांडे, मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) आणि पीके चतुर्वेदी, जीएम, मध्य रेल्वेचे सचिव यावेळी उपस्थित होते.



