भुसावळ : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीमार्फत प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ भुसावळचा संदेश देण्यासाठी गत सहा वर्षांपासून रोटरी सायक्लोथॉन या सायकल रॅलीचे आयोजन केले जाते. यंदाही रविवार, 14 जानेवारी रोजी सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 5, 10 आणि 20 किमी अशा तीन विभागात स्पर्धा होईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर (डी.एस.ग्राउंड) येथून सकाळी सहा वाजेपासून स्पर्धेला सुरूवात होईल.

असे आहे स्पर्धेचे स्वरूप
पाच किलोमीटर अंतरासाठी हॉटेल हेवनपासून परत, 10 किलोमीटर अंतरासाठी साईबाबा मंदिरापासून परत तर 20 किलोमीटर अंतरासाठी कुर्हे पानाचे येथून परत असा मार्ग असणार आहे. सर्व सायकल स्वारांसाठी रूट सपोर्ट तसेच सुरक्षेच्या दृष्टीने रीकव्हरी व्हॅन, एम्बुलंस आणि एनर्जी ड्रिंक्स, स्पर्धेनंतर नाश्ताची व्यवस्था करण्यात आली आहे. सहभागी स्पर्धकांना टीशर्ट, कॅप आणि गुडी बॅग मिळणार आहे.
शनिवार, 13 जानेवारी रोजी प्रभाकर हॉल येथे आयोजित सायक्लोथॉन एक्स्पो दरम्यान गुडी बॅगचे वितरण करण्यात येणार आहे. रॅली नंतर सहभागी सायकलस्वारांसाठी लकी ड्रॉ च्या माध्यमातून सायकल, हेल्मेट, स्मार्ट वॉच आदी बक्षिसे मिळणार आहेत. सायक्लोथॉनसाठी नाव नोंदणी शहरातील अष्टभुजा डेअरी, यावलकर कॉम्प्युटर्स, कल्पना रसवंती, व्यंकटेश स्टील, रुपलता मेडिकल, प्रभाकर हॉल येथे सुरू आहे. भुसावळकरांनी जास्तीत-जास्त संख्येने सहभागी होऊन प्रदूषण मुक्तीचा संदेश द्यावा, असे आवाहन प्रकल्प प्रमुख सुधीर पाचपांडे, सह प्रमुख आशिष पटेल, रोटरी अध्यक्ष मनोज सोनार, सचिव तेजस नवगाळे आदींनी केले आहे.


