कौटुंबिक वादातून पत्नीवर मद्यपी पतीने केला चाकूहल्ला : गोजोरा गावतील घटना –

भुसावळ : पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत दारूच्या नशेत पतीने चाकूने हल्ला केल्याची घटना भुसावळ तालुक्यातील गोजोरा येथे रविवार, 22 रोजी सायंकाळी सात वाजता घडली. याप्रकरणी पतीविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयित अजय प्रकाश सपकाळे (35, आसोदा, ता.जि.जळगाव) हा आपल्या पत्नी सुरेखा सपकाळेसह वास्तव्याला आहे. गेल्या काही दिवसांपासून पत्नी सुरेखा ह्या भुसावळ तालुक्यातील गोजोरा येथे माहेरी आल्यानंतर रविवार, 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातवाजेच्या सुमारास अजय सपकाळे हा दारू पिऊन गोजोरा येथे आलेला होता. त्यावेळी त्याने पत्नी सुरेखा आणि त्यांची आई छायाबाई सोनवणे हे दोघे ओट्यावर बसलेले असतांना पत्नी सुरेखाला शिवीगाळ केली व नंतर हातातील चाकू घेवून सुरेखावर हल्ला चढविला. यात सुरेखा या महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी सोमवार, 23 ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता छायाबाई सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अजय सपकाळे याच्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक अमोल पवार करीत आहे.