भुसावळातील तिघांवर लवकरच होणार एमपीडीएची कारवाई


भुसावळ : पोलिस प्रशासनाकडून शहरातील तिघांच्या एमपीडीएचे प्रस्ताव पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले असून उपद्रवींवर लवकरच स्थानबद्धतेची कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आगामी काळात पालिकेची निवडणूक असून शहरात निर्भयमुक्त वातावरणात निवडणुका घेण्याचे पोलिसांचे नियोजन आहे. त्यानुषंगाने उपद्रवींचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.

आतापर्यंत पाच उपद्रवींवर कारवाई
शहरातील बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उपद्रवी गुन्हेगारांविरूध्द पोलिस प्रशासनाकडून एमपीडीएचे प्रस्ताव तयार करण्याची मोहिम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यत शहरातून पाच जणांविरूध्द एमपीडीएची कारवाई जिल्हाधिकारी यांनी केली आहे. अजूनही तीन जणांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे रवाना करण्यात आले आहेत. आगामी पालिका निवडणूका, सार्वजनिक कार्यक्रम शांततेत पार पडावे यासाठी पोलिस प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे. निवडणूका शांततेत पार पडाव्यात यासाठी पोलिस प्रशासनाकडून एमपीडीए, हद्दपारीचे प्रस्ताव तयार केले जात आहे. पाच प्रस्तावांवर निर्णय होऊन संबंधित गुन्हेगार यांना अन्य जिल्ह्यातील कारागृहात रवाना करण्यात आले तर आता तीन प्रस्तांवाबाबतही लवकरच निर्णय होणार आहे. डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघण, बाजारपेठ निरीक्षक बबन आव्हाड यांनी एमपीडीएचे प्रस्ताव तयार करून वरीष्ठांकडे पाठविले आहे. येत्या पंधरवड्यात या प्रस्तावांवर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.