भुसावळ –
जागर उमलत्या…स्त्री शक्तीचा
स्त्री ही अजिंक्य,अभेद्य,कनवाळू,पालनहारी,वीरता,साहस सौंदर्य, धैर्य , रौद्र या नवगुणांनी संपन्न असते. नवरात्रीत आपण स्त्रीच्या याच नवगुणांची पूजा करतो.परंतु हे फक्त नऊ दिवसांसाठी न राहता कायम राहिले पाहिजे.हीच संकल्पना मनात ठेवून सक्षम नारी फ़ाउंडेशन ने जागर करूया उमलत्या नारी शक्तीचा ह्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे
नवरात्रीचे अवचित्य साधून आयोजन केले.
यावेळी जागर..उमलत्या स्त्री शक्तीचा या उपक्रमात सक्षम नारी फ़ाउंडेशन मधील उपस्थित सर्व सख्या यांनी भुसावळ मधील मराठा समाज संचालित टिंबर मार्केट येथील श्री गाडगेबाबा हायस्कूल शाळेला भेट देऊन त्या शाळेतील कन्या शक्तीला जी भविष्यातील नारी शक्ती आहे त्यांच्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी केले.
सर्वप्रथम सौ. सुनिता जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. देवी स्वरूपातील दोन विद्यार्थिनींच्या हस्ते दिपप्रज्वलन व सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पाहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सक्षम नारी फाउंडेशन अध्यक्ष डॉ. सुवर्णा गाडेकर ह्यांनी मुलांना पौगंडावस्थेत होणारे शारीरीक व मानसिक बदल विषद करून त्यांना कसे सामोरे जावे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच मुलींना मासिक पाळीचे विज्ञान सोप्या भाषेत सांगून त्याबद्दल मनात असणारे गैरसमज दूर केले. सक्षम नारी फाउंडेशन सदस्य शीतल भालेराव, शीतल मोरे, सुनंदा डांगे व डॉ. वैशाली ह्यांनी ‘ निर्णय’ ही नाटिका सादर करून चुकीचा निर्णय आयुष्य उद्ध्वस्त करतो त्यामुळेच योग्य निर्णय घेऊन, मोबाईल आणि सोशल मिडीयाचा अतिवापर टाळून व व्यवस्थित अभ्यास करून स्वावलंबी बनण्याचा सल्ला दिला. ह्याच शाळेतील माजी विद्यार्थिनी डॉ वैशाली रामवंशी ह्यांनी माझा प्रवास ह्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. तुमच्यासारखीच मी ह्या शाळेत शिकून प्रतिकुल प्ररिस्थितीतून मात करीत प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनत करून आज आपण यशस्वी भूलतज्ज्ञ झालो असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे स्त्रीजीवनावर आधारित नृत्य सादर केले. मुलांना केवळ एक दिवस प्रोत्साहन न मिळता नेहमीच त्यांना मार्गदर्शन मिळावे म्हणून यशस्वी स्त्रीयांचे तसेच इतर प्रोत्साहन देणारी पुस्तके वाचाल तर वाचाल हा संदेश देत सक्षम नारी फाउंडेशन कडून शाळेच्या वाचनालयाला भेट म्हणून देण्यात आली. सुत्रसंचालन सुनिता जोशी यांनी तर आभार प्रदर्शन सक्षम नारी फाउंडेशनच्या पल्लवी अंबाडे ह्यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी डॉ. प्रशांत रामवंशी ,मुख्याध्यापक के. एल. पाटील , तपकिरे सर,जयश्री वाणी , रंजना पाटील , रेणुका शर्मा , राहुल लोणाग्रे, अमोल पाटील इ शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, सुयश सोनार हे उपस्थित होते. अल्पोपहार व मठ्ठा वाटून या सुंदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन म्हणून शीतल मोरे यांनी कार्य केले.



