बारावी निकालात यंदाही कोकणच टॉपर : राज्याचा निकाल 91.25 टक्के –

मुंबई : बारावी परीक्षेचा निकाल गुरुवार, 25 मे रोजी जाहीर करण्यात आला असून यंदादेखील कोकण विभागच टॉपर राहिला आहे तर राज्याचा निकाल मात्र 91.25 टक्के लागला. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी दुपारी दोन वाजेनंतर संकेत स्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

राज्याचा निकाल 91.25 तर कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 96.01 तर सर्वात कमी निकाल मुंबई 88.13 टक्के लागल्ल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

राज्यात निकालाचा टक्का घसरला
राज्यात 14 लाख 16 हजार 371 विद्यार्थी प्रविष्ट होते मात्र त्यातील 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्याच्या निकालाची टक्केवारी 91.25 असून कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 96.01 टक्के तर सर्वात कमी निकाल मुंबई 88.13 टक्के लागला आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 93.73 टक्के असून मुलांचा निकाल 89.14 टक्के एवढा आहे. मुलांपेक्षा 4.59 टक्के जास्त आहे.

गुण पडताळणीसाठी 26 मे पासून करा अर्ज
ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर बारावी परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांतील गुणांची पडताळणी करता येणार आहे. उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन संकेतस्थळावरून स्वत: तसेच कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी,शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना बारावीची गुणपत्रिका व स्थलांतर प्रमाणपत्र त्यांच्या शाळा महाविद्यालयामार्फत 5 जून पासून दुपारी तीन नंतर मिळतील.