दोन कोटीची मालमत्ता हडपण्याची बनवाबनवी उघडकीस : महिलेसह तिघे ताब्यात :


जळगाव : दोन कोटी रुपयांची मालमत्ता हडपण्याच्या तयारीत असलेली टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतली असून महिलेसह तिघांना जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. दोन कोटी रुपयांची मालमत्ता हडपण्यासाठी बनावट महिला मालकीन तयार करुन खरेदी करुन देण्याचा डाव स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेने फसला आहे. राजु जगदेव बोबडे रा.विटनेर विठ्ठल रुखमाई मंदिर ता.जि.जळगाव, प्रमोद वसंत पाटील, रा.विरावली ता.यावल जि.जळगाव, गंगा नारायण जाधव रा.कौतिकनगर मागे अयोध्या नगर जळगाव अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

जळगाव शहराच्या अयोध्या नगर परिसरातील एक बखळ प्लॉट महिलेच्या नावावर आहे. ही महिला कामानिमित्त बाहेरगावी राहते. या मालमत्ताधारक महिलेएवजी बनावट महिला उभी करुन या तिन्ही प्लॉटची खरेदी करुन देण्याच्या तयारीत काही जण असल्याची गोपनीय माहिती पोलिस अधिक्षक एम.राजकुमार यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे पुढील तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील व त्यांचे सहकारी हे.कॉ. विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, संदिप सावळे, अभिलाषा मनोरे, पोना विजय पाटील, रविंद्र पाटील, ईश्वर पाटील, दर्शन ढाकणे, मोतीलाल चौधरी आदी कामाला लागले होते.