“भुसावळ रनर्सने केले धावून व व्यायाम करून नवीन वर्षाचे स्वागत: नवीन टी-शर्ट चे देखील अनावरण” :


भुसावळ – नवीन वर्षाचे स्वागत प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने करीत असतो. भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या धावपटूंनी देखील रनिंग करून व व्यायाम करून नवीन वर्षाचे स्वागत केले. यासाठी शंभरहून अधिक धावपटू 1 जानेवारी रविवारी सकाळी सहा वाजता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर जमले. त्यानंतर सुरुवातीस वॉर्म अप एक्झरसाइज घेण्यात आली. त्यानंतर धावायला सुरुवात झाली. प्रत्येक धावपटूने किमान दहा किमी अंतर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी धावण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांनी ते पूर्ण केले. दीपा स्वामी, डॉ निर्मल बलके, सुनील सोनगिरे, विश्वजीत वाघ, मंगेश चंदन, संतोष घाडगे, विजय फिरके, मुकेश चौधरी, संजय भदाणे, राजीव यादव, तरुण बिरिया, जितेंद्र चौधरी या धावपटूंनी तर तब्बल 23 किमी धावून 2023 चे स्वागत केले. त्यासाठी हे धावपटू पहाटे 4:30 वाजता धावण्यासाठी जमले होते. ठीक ७:३० वाजता सर्व धावपटू आपापली रनिंग आटोपून मैदानावर परतले. त्यावेळी स्टेचिंग एक्सरसाइज घेण्यात आली. त्यानंतर प्रियंका मंत्री, मोनिका देशमुख, माया पवार, पुष्पा वंजारी, मीना नेरकर, पारुल वर्मा, माधुरी चौधरी, स्नेहा महाजन, तृप्ती नगरनाईक, पूनम पाटील, प्रणोती ढाके या नवोदित महिला धावपटूंच्या हस्ते नवीन टी-शर्टचे अनावरण करण्यात आले. यावेळी सर्व धावपटूंनी टाळ्या वाजवून एकच जल्लोष केला. याप्रसंगी पाच वर्षांपूर्वी तयार केलेल्या टी-शर्ट साठी ब्रिजेश लाहोटी यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे प्रवीण पाटील यांनी सांगितले. त्याचप्रमाणे नवीन टी-शर्ट हा पांढरा असून त्यावर हिरवा व केशरी रंगाच्या छटा आहेत. त्यामुळे हा टी-शर्ट घालून धावताना देश प्रेम अधिक ओसंडून वाहील अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर प्रवीण फालक यांनी अधिकृत टी-शर्ट चे महत्व उपस्थितांना विशद केले.