साकेगाव परिसरात वाघूर नदीत १२ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला :


भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथील वाघूर नदीच्या काठावर शनिवारी १२ वर्षीय अनोळखी मुलाचा कुजलेला मृतदेह अाढळला. हा मृतदेह नेमका कुणाचा , तो नदीपात्रात कसा आला ,असे प्रश्न उपस्थित झाले असून याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
साकेगाव येथील वाघूर नदीवरील रेल्वेचा पूल आहे. या परिसरात नदीकाठावर सुमारे १० ते १२ वर्षीय मुलाचा मृतदेह तरंगताना आढळला. ही माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे यांनी घटनास्थळ गाठले. तेथे पाहणी केल्यावर मृतदेह कुजल्याचे लक्षात आले. दरम्यान, जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात एक अल्पवयीन मुलगा हरवल्याची नोंद मध्यंतरी झाली होती. त्यानुषंगाने तेथील पालकांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाची पाहणी केली. मात्र, मृत बालक त्यांचा मुलगा नसल्याचे सांगण्यात अाले. यानंतर भुसावळ ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डाॅ.मयूर चाैधरी व सहकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. पोलिसांनी परिसरातील विविध गावांमध्ये माहिती देऊन कुणाचा मुलगा हरवला आहे का? याचा शोध घेतला. पण, उपयोग झाला नाही.

दरम्यान, नियमानुसार अनोळखी मृतदेह तीन दिवस जतन करून ठेवण्याच्या स्थितीत नव्हता. यामुळे पाेलिसांनी साकेगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सायंकाळी अंत्यसंस्कार केले. भानखेडा येथील पोलिस पाटील शरद पाटील यांच्या खबरी वरून तालुका पोलिसांत घटनेची नोंद झाली. एपीआय प्रकाश वानखेडे, जगदीश भाेई हे तपास करत अाहे.