पुरी-अजमेर एक्स्प्रेस मधून पर्स चोरी, महिलेसह नंदुरबारचे चौघे गजाआड :


भुसावळ : पुरी-अजमेर एक्स्प्रेसमधील महिला प्रवाशाची पर्स शुक्रवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास भुसावळ जंक्शनवर चाेरट्यांनी लांबवली. त्यात सुमारे ९५ हजार रूपयांचा ऐवज हाेता. यानंतर अारपीएफ जवानांनी अवघ्या अडीच तासातच एका महिलेसह चार जणांच्या स्थानकावर मुसक्या अावळल्या. हे चौघे नंदुरबारचे रहिवासी आहेत. त्यांच्याकडून चाेरीचा मुद्देमाल हस्तगत करून लाेहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सूरत येथील पूजा आव्हाड ही महिला पुरी-अजमेर एक्स्प्रेसच्या एस-४ डब्यातील सीट ७८ वरून प्रवास करत हाेती. भुसावळ स्थानक येण्यापूर्वी रात्री १२.१० वाजता झोपेचा गैरफायदा घेत चोरट्यांनी त्यांची पर्स लांबवली. त्यात ९५ हजारांचा मुद्देमाल होता. हा प्रकार भुसावळ येथे पूजा यांच्या लक्षात आला. नंतर त्यांनी भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दिली. मलकापूर येथून एक महिला व तीन तरुणांबद्दल संशय व्यक्त केला. त्यानुसार तपास करत शनिवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास अारपीएफचे उपनिरीक्षक अनिल तिवारी, इम्रान खान, भूषण पाटील, मनीष कल्याणी यांनी फलाट क्रमांक ७ वर एक महिला व तीन तरुण अशा चार जणांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांच्याजवळ चाेरीचा मुद्देमाल आढळला. विशेष म्हणजे यातील संशयित महिला गर्भवती अाहे. विक्रम, कार्तिक, अविनाश व लक्ष्मी नायडू असे संशयितांची नावे अाहेत. ते नंदुरबार येथील रहिवासी अाहे. अारपीएफ निरीक्षक अार.के.मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. नंतर संशयितांना लोहमार्ग पोलिसांकडे सोपवण्यात आले. लोहमार्ग पोलिसांनी चौघांना शनिवारी न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयीन काेठडी मिळाली आहे.