थंडगार जार पाणपोईचे आमदार सावकारे यांच्या हस्ते उद्घाटन : पाणपोई सेवेचा आता बदलता लुक :


भुसावळ : बदलत्या काळानुसार पाणपोई सेवेने आपला लुक बदलला असुन तो अधिक स्मार्ट केला आहे. येथील रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीच्या थंडगार जार पाणपोईचे नुकतेच आमदार संजय सावकारे यांनी उद्घाटन केले.
शहराचे तापमान आता ४५ डिग्री पर्यंत पोहचले आहे. जास्त तापमानाच्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून भुसावळचेही नाव घेतले जाते. बाजारात येणारा ग्रामीण भागातील माणुसही ताहनेने व्याकुळ होऊन पाणपोई शोधतो. कारण सगळ्यांनाच पाण्याची बाटली विकत घेणे शक्य होत नाही. पाण्याची गरज ओळखून काही सामाजिक ट्रस्ट तर्फे काही भागात कायम स्वरुपी पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच मोठी रांजण लावुन त्यावर लाल फडके टाकुन पाणपोई सुरू करण्याची जुनी परंपरा आहे. यात नियमितपणे राजण धुणे, पाणी भरणे आदी जबाबदारी पार पाडावी लागते. शिवाय पाण्याच्या शुध्दतेचाही प्रश्न पडतो. काही धनिक आपल्या दुकानासमोर जार ठेवतात. शिवाय काहींनी विविध ठिकाणी स्वखर्चाने जार ठेवण्याचा उपक्रम राबविला. मात्र पांडुरंग टॉकीज जवळील रीक्षा व बस थांब्या शेजारी रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी तर्फे चक्क जार पाणपोई उभारली. त्यासाठी एक लोखंडी रॅक उभारण्यात आले. रोज पंचवीस थंडगार पाण्याचे जार भरुन ठेवले जाणार आहे. या पाणपोईच्या उपक्रमाचे प्रवाश्यांनीही कौतुक केले. याप्रसंगी क्लबचे सचिव आशिष अग्रवाल, विकास पाचपांडे, डॉ. मकरंद चांदवडकर, सोनु मांडे, आशिष पटेल, अरविंद वारके, डॉ. प्रविण वारके, विशाल शाह, रणजीत खरारे, महेश चौधरी तसेच मिनीडोअर चालक मालक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.