भुसावळ नाहाटा महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा :

भुसावळ प्रतिनिधी- भुसावळ कला, विज्ञान,आणि पु. ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालय,भुसावळ येथे वाङमय, वादविवाद, नाट्यशास्त्र मंडळ व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास पी.आर.हायस्कूल धरणगाव, येथील मुख्याध्यापक कवी डॉ.संजीवकुमार सोनवणे यांनी ‘मराठी भाषा काल, आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यान दिले. व्याख्यानात त्यांनी, “मराठीतील गाथासप्तशती या ग्रंथांचा संदर्भ देत मराठी भाषेला अडीच हजाराहून अधिक वर्षांचा इतिहास असल्याचे सांगितले. तसेच शासनाने इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी भाषा सक्तीची केल्याचे सांगितले. वाचन संस्कृती वाढून मराठी भाषेचा विकास कसा होईल यावरही आपण भर दिला पाहिजे”. मराठी भाषेतील साहित्य परंपरा समृद्ध असून संशोधनासाठी अधिकाधिक संशोधकांनी पुढे यायला पाहिजे. तसेच मराठी भाषा ही प्रत्येक विद्यापीठातून शिकविली पाहिजे. दैनंदिन व्यवहारात बोलतांना मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे.” असे मुद्दे मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. एस. व्ही.पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतात, “ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे अमृतापेक्षा गोड असलेल्या मराठी भाषेच्या उगमाविषयीची मतमतांतरे या विषयी आढावा घेतला”.महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सौ. मीनाक्षी वायकोळे यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक, मराठी विभागातील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. जे. एफ. पाटील यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी, “जागतिक स्तरावर मराठी भाषा बोलणारा मोठा वर्ग आहे” असे सांगितले. कार्यक्रमात वक्त्यांचा परिचय, डॉ.दीनानाथ पाठक यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. पुरुषोत्तम महाजन यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. भारती सोनवणे यांनी केले. सदर कार्यक्रमास मराठी विभागप्रमुख प्रो. डॉ.के के अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मराठी विभागातील प्रा. गौतम भालेराव, डॉ स्वाती महाजन,प्रा.वंदना महाजन यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.