भुसावळ- प्रभाग क्रमांक १७ मधील रामदेव बाबा नगर, सिध्येश्वर मंदिर परिसर, तळेले कॉलनी आणि कबरस्तान जवळील भाग येथे रस्ते खराब असल्याकारणाने काही दिवसांपूर्वी दुरुस्ती साठी मुरूम टाकून भुसावळ नगरपालिकेतर्फे हे खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला गेला. आता याच खड्ड्यांचे पॅचवर्क न झाल्यामुळे तसेच या खड्ड्यातील मुरमातील मोठ्या दगडांमुळे अनेक नागरिकांना त्रास होत आहे. काही नागरिकांचा छोट्या प्रमाणात अपघात झाला तर काहींना मोठी इजा झाली. त्यामुळे या रस्त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.
रस्ता व्यवस्थित बनलेला आहे की नाही? स्त्यावरील खड्डे व्यवस्थित दुरुस्त झाले आहेत का? काम पूर्णत्वास आले आहे का? मुरमावर रोलर फिरवले गेले आहे का? हे तपासणे पालिका अभियंत्याचे काम असते. ही सर्व तपासणी अधिकाऱ्याने करणे आवश्यक होते परंतु अशी तपासणी झाली नाही. याठिकाणी वाहनधारकांना तसेच पायी चालणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात मोठे मोठे दगड असल्याकारणाने अपघातांची संख्या वाढलेली आहे. म्हणून सोमवार, दिनांक ८ नोव्हेंबर रोजी, सकाळी ११ वा. या भागातील नागरिकांसोबत भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांची भेट घेणार असल्याचे राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे शहर अध्यक्ष निलेश कोलते यांनी कळविले आहे.



