मुंबई: राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. उलट या गुन्ह्यांमध्ये अतिशय वेगाने वाढ होत आहे. लखनौहून मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये सात ते आठ जणांनी दरोडा टाकला. तसेच एका महिला प्रवाशावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून, यामुळे खळबळ उडाली आहे. कल्याण जीआरपी पोलिसांनी तीन दरोडेखोरांना अटक केली असून, इतरांचा शोध घेतला जात आहे. चार आरोपींच्या शोधात संभाव्य ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ- मुंबई पुष्पक एक्सप्रेस शुक्रवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास इगतपुरी स्टेशनहून रवाना झाली. मार्गात आलेल्या बोगद्याजवळ ही गाडी हळू झाली असता, अचानक 7 ते 8 दरोडेखोर रेल्वेत शिरले. ज्यांनी पहिल्या 15 ते 20 प्रवाशांची लूट केली. त्यानंतर ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका 20 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला. सध्या या संपूर्ण प्रकरणात 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास स्लीपर कोचमध्ये घडली. या अनपेक्षित घटनेमुळे प्रवाशांमध्ये लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
जीआरपीचे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा गाडी घाट परिसरातून जात होती. त्यावेळेस दरोडेखोरांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. घाट ओलांडल्यानंतर कसारा रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यावर पीडितेने प्रवाशांकडे मदतीची याचना केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जीआरपीनेही तत्काळ कारवाई केली. सध्या 3 दरोडेखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर इतर चार जणांचा शोध सुरू आहे. जीआरपी आणि गुन्हे शाखेच्या पथकाकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. दरोडेखोरांकडून सुमारे 96,390 रुपयांची मालमत्ता, मुख्यतः मोबाईल फोन आणि 34,200 रोख जप्त करण्यात आले आहेत


