मुंबई –

विश्रांती घेतलेला मान्सून राज्यात पुन्हा सक्रिय झाला आहे. आज महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने महाराष्ट्रात आज सर्वत्र पाऊस असणार अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तर परवापासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर ओसरणार आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिमुसळधारेचा इशारा
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिमुसळधारेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर विदर्भ आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यवतमाळ जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आज सकाळी 8.30 पर्यंत उमरखेडमध्ये 112 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. नाशकातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.


