भुसावळ प्रांताधिकार्‍यांसह तलाठ्यांना दमदाटी : डंपर चालकास अटक –


भुसावळ : डंपर मालकाने भुसावळचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे व तलाठ्यास दमबाजी केल्याची घटना शनिवार, 17 रोजी रात्री घडली होती. या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर डंपर चालक डिगंबर कोळी (रा.साकेगाव) यास बुधवारी तालुका पोलिसांनी अटक केली आहे. संशयीतास न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.


प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, तलाठी विनोद बारी तसेच दीपक कापसे, चालक ताराचंद बाविस्कर, तहसीलदार यांच्या वाहनावरील चालक विलास नारखेडे हे शनिवार, 17 जुलैला रात्री 8 वाजता सरकारी वाहनाने साकेगाव शिवारात गस्त करीत असता रात्री नऊ वाजेच्या सुमारास भुसावळ ते जळगाव महामार्गावर वाघूर नदीच्या पुलाच्या अलीकडे गौण खनिजाची वाहतूक करणार्‍या एका डंपरला थांबवण्यात आले होते. संबंधिताकडे परवान्याची विचारणा केल्यानंतर तो न आढळल्याने डंपर तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्याच्या सूचना करण्यात आल्या मात्र चालकाने डंपर पळवून थेट साकेगावमध्ये नेला. पथकाने यावेळी पाठलाग केला असता डंपर मालक अविनाश चुडामण सोनवणे यांनी डंपर आपले असल्याचे सांगत जे होईल ते करा, अशी धमकी देत पथकाच्या अंगावर धावून दमदाटी केली होती. या प्रकरणी डिगंबर कोळी, अविनाश सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुधवारी तालुका पोलिसांनी डंपर चालक डिगंबर कोळी यास अटक केली. तपास निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.