भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील शनी मंदिर वॉर्डात किरकोळ वादाचे हाणामारीत रूपांतर होवून चाकू व रॉडने हल्ला करण्यात आल्याने दोघे भाऊ जखमी झाले तर तक्रारदाराच्या आईलादेखील शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात सहा संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मनीष दिनेश पाटील (16, शनी मंदिर वॉर्ड, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपीने लांब रूमाल घेतल्याने तो 12 रोजी मागितल्याने वाद झाला होता व 13 रोजी संशयीतांनी या वादाची कुरापत काढून शिवीगाळ व मारहाण केली व याबाबत तक्रारदाराने आपला भाऊ कुणाल पाटील यास ही बाब सांगितल्यानंतर दोघांनी आरोपींना विचारणा केल्याने आरोपींना राग आला व त्यांनी आपल्या पालकांना बोलावल्याने वाद विकोपाला गेला. तक्रारदाराच्या पाठीवर चाकू मारण्यात आला तर त्यांचे भाऊ कुणाल यांना रॉड मारून जखमी करण्यात आले. तक्रारदार रुग्णालयात व कुणाल हे पोलिसांना माहिती देण्यासाठी गेल्याने घरी एकट्या असलेल्या तक्रारदाराच्या आई सुवर्णा पाटील यांचे केस ओढून एका आरोपीने वरच्या मजल्यावरून खाली आणले व अन्य आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप आहे.
घटनेची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, सहा.अधीक्षक अर्चित चांडक व बाजारपेठ पोलिसांनी धाव घेतली.
फिर्यादी मनीष दिनेश पाटील यांनी नरेश भिका चौधरी,प्रमोद भिका चौधरी,अनिल चौधरी,भिका चौधरी,यश अनिल चौधरी, भावेश अनिल चौधरी यांच्या विरुद्ध फिर्याद दिल्या वरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला कलम ४५२,३२४, १४३, १४७,१४८,१४९,३२३,५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ वाल्मिक सोनवणे करीत आहे.



