शेतकऱ्यांनो काळजी घ्या ! राज्यातील ‘या’ भागात उद्यापासून गारपिटीचा अंदाज


मुंबई : हवामानात बदल होत असून उत्तर मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागात चक्रावात कायम आहे. केरळ किनारपट्टीलगतच्या आग्नेय अरबी समुद्रापासून उत्तर मध्य महाराष्ट्रातील चक्रवातापर्यंत तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता केरळ किनारपट्टी ते उत्तर मध्य महाराष्ट्रपर्यंत आहे.
या बदलांमुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात १५ ते १८ फेब्रुवारीदरम्यान पावसासह गारा पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, या हवामानातील बदलाचा फटका शेत पिकांना बसण्याची शक्यता असुन शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी अशा सूचना हवामान विभागाने दिल्या आहे.
पुणे येथे १३.२ अंश सर्वात कमी किमान तापमान नोंदविण्यात आले असून, मुंबईचे किमान तापमान १९.४ अंश नोंदविले आहे. गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. सरासरीच्या तुलनेत विदर्भाच्या बऱ्याच भागात तर मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.
मराठवाड्यासह विदर्भात पाऊस १६ फेब्रुवारी रोजी पडेल. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात १७ व १८ फेब्रुवारी रोजी पाऊस पडेल. तसेच विदर्भात गारा कोसळतील. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *