भुसावळ (प्रतिनिधी) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल येथील मराठी विभाग प्रमुख व भुसावळ येथील रहिवासी प्रा. डॉ. सुधा खराटे यांनी हिंदीचे प्रसिद्ध कादंबरीकार भगवानदास मोरवाल यांच्या ‘शकुंतिका’ कादंबरीचा मराठी मध्ये अनुवादित केलेल्या ‘चिमणी’ कादंबरीचे प्रकाशन नुकतेच प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. रजनी सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार उज्ज्वला बागुल उपस्थित होत्या तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दे. ना. भोळे महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. भारती बेंडाळे यांनी भूषविले.
प्रारंभी प्रा. डॉ. सुधा खराटे यांनी आपल्या प्रास्तविकात अनुवादाची प्रेरणा व प्रक्रियेवर विस्तृत प्रकाश टाकला. प्रसंगी सौ. रजनी सावकारे यांनी आपले विचार व्यक्त करताना असे नमूद केले की ‘चिमणी’ मुलींबद्दलचा दृष्टिकोन बदलण्याची प्रेरणा देणारी कादंबरी असून त्यापासून समाजाने शिकवण घ्यावी असे मला वाटते. मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी सतत प्रयत्नशील असावे असे देखील त्यांनी प्रतिपादित केले.
प्रमुख अतिथी पत्रकार उज्ज्वला बागुल यांनी असे विशद केले की अनुवाद करणे ही एक खडतर प्रक्रिया आहे. परंतु अनुवादिकेने हे आव्हानात्मक कार्य यशस्वीपणे पूर्ण केले हे विशेष .तर आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. भारती बेंडाळे यांनी सांगितले की अनुवाद काळाची गरज असून त्यामुळे आपणास इतर भाषा व प्रांतातील समाज, संस्कृती व सभ्यता समजण्यास मदत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा राजश्री देशमुख यांनी आपल्या बहारदार शैलीत सादर केले तर ऋणनिर्देश सौ. स्वाती चौधरी यांनी व्यक्त केले.
सदर समारंभास सुनिता तळेले, संध्या पुरंदरे, लता कोटेचा, ए. टी. चौधरी, पल्लवी पवार तसेच मितवा, मनवा, ओवी, परी, अनवी, उर्वी, इ. चिमण्या देखील उपस्थित होत्या.



