साकेगाव बसस्थानकाजवळील घटना; एकाची प्रकृती चिंताजनक, संशयित हल्लेखोरांचा शोध सुरु; भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे जुन्या वादातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना मंगळवारी, दि. २९ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८ वाजता घडली. या हल्ल्यात राहुल संतोष कोळी (वय २४) आणि कुणाल बाळू वाघ (वय २३, दोन्ही रा. साकेगाव, ता. भुसावळ) हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल कोळी आणि कुणाल वाघ हे दोघे साकेगावातील एकाच परिसरात राहतात. मंगळवारी रात्री दोघेही रुग्णालयात जाण्यासाठी साकेगाव बसस्थानकावर थांबले होते. त्यावेळी भुसावळ येथील काही संशयित तरुण तेथे आले. जुन्या वादाच्या कारणावरून त्यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी संशयितांनी धारदार शस्त्राने दोघांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. राहुल कोळी याच्या मानेवर वार करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून, कुणाल वाघ याच्यावरही शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरात काही काळ खळबळ उडाली. जखमी दोघांना तातडीने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून, एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेची प्राथमिक माहिती घेत संशयित हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, परिसरातील माहिती तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जात आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. हल्ल्यामागील नेमके कारण, पूर्वीचा वाद आणि हल्ल्यात सहभागी असलेल्या संशयितांची भूमिका याबाबत पोलीस तपास करीत आहेत. साकेगावसह भुसावळ तालुक्यात घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.


