घरातच उरकले १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न; २८ वर्षीय पतीसोबत दोघेही बेपत्ता ; पाचोरा तालुक्यातील पुनगाव येथील प्रकार; मोठ्या बहिणीची पोलिसांत तक्रार, तपास सुरू

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील पुनगाव येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे २८ वर्षीय तरुणासोबत घरातच लग्न लावून दिल्याचा आरोप समोर आला आहे. लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात असल्याचे मुलीने मोठ्या बहिणीला सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, २८ सप्टेंबरपासून संबंधित तरुण हा अल्पवयीन मुलीला सोबत घेऊन बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या मोठ्या बहिणीने पाचोरा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, संबंधित मुलगी १४ वर्षे १९ दिवसांची आहे. आईची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तिच्या संगोपनासाठी मुलीला आजीकडे ठेवण्यात आले होते. सुमारे आठ महिन्यांपूर्वी तिची आई आशा संभाजी भोसले यांनी मुलीला आजीकडून घेऊन पुनगाव येथील रविंद्र पाटील यांच्या घरी सांभाळासाठी ठेवले होते.
दरम्यान, १७ सप्टेंबर रोजी मुलगी आपल्या बहिणीच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त तितूर-सोयगाव येथे आली होती. त्यावेळी तिच्या गळ्यात मंगळसूत्र असल्याचे बहिणीच्या निदर्शनास आले. याबाबत विचारणा केली असता, पुनगाव येथील रविंद्र पाटील यांचा मुलगा योगेश रविंद्र पाटील (वय अंदाजे २८) याच्यासोबत सुमारे चार महिन्यांपूर्वी घरातच लग्न लावून दिल्याचे तिने सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.
लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात असल्याचेही मुलीने बहिणीला सांगितल्याचा आरोप आहे. तसेच मुलबाळ होण्यासाठी आपल्यावर विविध प्रकारचे दोरे-धागे करण्यात येत असल्याचे तिने सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर १८ सप्टेंबर रोजी मोठी बहीण आणि तिच्या पतीने मुलीला पुनगाव येथील तिच्या सासरी सोडले.
मात्र, २८ सप्टेंबर रोजी योगेशचा फोन बंद येत असल्याने मुलीच्या आईने मोठ्या जावयाला पुनगाव येथे जाऊन पाहणी करण्यास सांगितले. तो तेथे पोहोचला असता मुलगी आणि योगेश दोघेही घरात आढळून आले नाहीत. घरातील महिलेने योगेशच्या आजीची तब्येत खराब असल्याने दोघेही तेथे गेल्याचे सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यानंतर मानवाधिकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षा पूनम दीपक खैरनार, मीना प्रकाश बोरसे आणि शारदा तायडे यांनी प्रकरणाची माहिती मुलीच्या मोठ्या बहिणीला दिली. तसेच पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिल्यानंतर मोठी बहीण आणि तिचे पती राहुल भगवान मोरे यांनी पाचोरा पोलीस ठाणे गाठले.
अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही योगेश रविंद्र पाटील याच्यासोबत मुलीचे लग्न लावून दिल्याचा आरोप रविंद्र पाटील आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींवर करण्यात आला आहे. तसेच २८ सप्टेंबरपासून योगेश हा अल्पवयीन मुलीला सोबत घेऊन कुठेतरी निघून गेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी योगेश रविंद्र पाटील याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून, पाचोरा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. प्रकरणात प्रारंभिक मदत व मार्गदर्शन मानवाधिकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षा पूनम दीपक खैरनार यांच्यासह मीना प्रकाश बोरसे व शारदा तायडे यांनी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.