प्रभाग क्रमांक २३ मध्ये नियमित घंटागाडी व स्वच्छतेची मागणी ; घंटागाडी अनियमित येत असल्याने नागरिक त्रस्त; मोकळ्या जागांवर कचऱ्याचे ढीग

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील प्रभाग क्रमांक २३ मध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून कचरा संकलन करणारी घंटागाडी अनियमित तसेच अवेळी येत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रभागातील प्रत्येक भागात दररोज घंटागाडी फिरून घराघरातून कचरा संकलित करणे अपेक्षित असताना अनेक वेळा चार-पाच दिवस घंटागाडी येत नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.

घंटागाडी नियमित न आल्याने नागरिकांना घरातील कचरा साठवून ठेवावा लागत आहे. परिणामी काही ठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा तसेच मोकळ्या जागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येत आहेत. हा कचराही नियमितपणे उचलला जात नसल्याने परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी तसेच डास आणि माशांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत आहे.

QR कोडची व्यवस्था कागदावरच?

दरम्यान, दोन-तीन वर्षांपूर्वी कचरा संकलन व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी प्रत्येक घरावर QR कोड लावण्यात आले होते. घरातून कचरा उचलल्यानंतर संबंधित घंटागाडी कर्मचाऱ्याने QR कोड स्कॅन करण्याची व्यवस्था असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात या व्यवस्थेचा नियमित वापर होताना दिसत नसल्याने QR कोडची संकल्पना केवळ निविदेपुरतीच मर्यादित राहिली का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

ओला-सुका कचरा वर्गीकरणही प्रभावीपणे राबविण्याची मागणी

प्रभागात ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्याची व्यवस्थाही प्रभावीपणे व नियमितपणे राबवली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कचरा संकलनाच्या संपूर्ण व्यवस्थेचे नियोजन करून त्याची नियमित अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.

ॲड. जास्वंदी भंडारी यांची मागणी

प्रभाग क्रमांक २३ मधील कचरा संकलनाची समस्या तातडीने दूर करण्यासाठी सकाळच्या वेळेत दररोज नियमित घंटागाडी सुरू करावी, मोकळ्या जागांवर व रस्त्यांच्या कडेला साचलेला कचरा तातडीने उचलावा, तसेच ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्याची व्यवस्था प्रभावीपणे राबवावी, अशी मागणी ॲड. जास्वंदी भंडारी यांनी केली आहे.

नगरपालिकेने प्रभाग क्रमांक २३ मधील स्वच्छतेच्या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन नियमित कचरा संकलन व स्वच्छता व्यवस्था सुरळीत करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.