कट्टर शिवसैनिक उमाकांत शर्मा यांच्या मुलाचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा ; पियुषच्या वाढदिवसानिमित्त अन्नदानासह शालेय साहित्याचे वाटप.

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील कट्टर शिवसैनिक उमाकांत शर्मा यांचे पुत्र पियुष यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. शिवसेनाप्रमुख मा. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ ही शिकवण आचरणात आणत समाजाप्रती आपली काहीतरी देणगी असावी, या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला.
पियुषच्या वाढदिवसानिमित्त शिवभोजन अन्नदान, श्री सूर्यमुखी हनुमान मंदिर येथे खुर्च्यांचे दान, तसेच गोरगरीब व गरजू शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजू घटकांसोबत तो साजरा करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात आला.
उमाकांत शर्मा हे आपल्या परिवारातील सदस्यांचे तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे वाढदिवस शक्यतो सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरे करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. समाजासाठी काहीतरी देणे लागतो, ही भावना मनात ठेवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बळीराजासाठी सुख-समृद्धीची प्रार्थना
यावेळी सध्या निर्माण झालेल्या पावसाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बळीराजासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, पुरेसा पाऊस पडावा, शेतीपिकांना चांगले उत्पन्न मिळावे आणि बळीराजा सुखी-समृद्ध व्हावा, अशी प्रार्थना करण्यात आली. ‘बळीराजा सुखावला तर आपणही सुखी राहू’, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
मागील वर्षीही अशाच परिस्थितीत श्री भगवान परशुराम मंदिरात शांती यज्ञ आयोजित करून आपल्या परीने एका गरजू शेतकऱ्याला मदत करण्यात आली होती. यंदाही सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम ठेवत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.
परमेश्वराने संपूर्ण जगाला सुख, समृद्धी, धनधान्य आणि निरोगी आयुष्य प्रदान करावे, प्रत्येकाच्या जीवनात आनंद नांदावा आणि शेतकरी-कष्टकरी वर्गाच्या जीवनात समाधान यावे, अशी मनोभावे प्रार्थना यावेळी करण्यात आली.