जळगाव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बालकांचे हक्क व लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (POCSO Act) या विषयावर कार्यशाळा व परिसंवादाचे आयोजन ८ ऑगस्ट रोजी नियोजन हॉल, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, जळगाव येथे करण्यात आले. या कार्यशाळेस जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून प्रत्येकी दोन पीएलव्ही, वकील, न्यायाधीश, पोलीस अधिकारी तसेच कायद्याचे शिक्षण घेणारे विद्यार्थी उपस्थित होते. भुसावळ तालुका विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने पीएलव्ही संगीता राजेंद्र भामरे आणि पीएलव्ही राजेश्री सुरवाडे यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांनी बालकांचे हक्क, बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि अशा घटनांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी बालकांच्या सुरक्षिततेसाठी पालक, शिक्षक, समाज आणि प्रशासनाने एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त केली. शीतल लाड, मेडिकल केअर, जळगाव यांनी लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांना देण्यात येणारी मदत, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच्या उपाययोजना तसेच POCSO कायद्यांतर्गत करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. बसस्थानक, रिक्षा स्टँड, स्कूल बस आणि इतर सार्वजनिक ठिकाणी बालकांच्या सुरक्षेसाठी विशेष दक्षता घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. बालकांसाठी जनजागृतीपर कार्यशाळा घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. धिवरे यांनी दामिनी पथकाच्या कार्याची माहिती देताना महिला व बालिकांच्या सुरक्षेसाठी हे पथक कार्यरत असल्याचे सांगितले. आपत्कालीन परिस्थितीत ११२ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. एस. एस. बोरसे, असिस्टंट पोलीस ऑफिसर, जळगाव यांनी बालकांशी पोलिसांनी संवेदनशील पद्धतीने संवाद साधण्याचे महत्त्व स्पष्ट केले. बालकांना विश्वासात घेऊन त्यांची भीती दूर करणे आणि सुरक्षित वातावरण निर्माण करून खरी परिस्थिती जाणून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच POCSO कायद्यातील कलम २७ संदर्भातही त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एस. देशमुख यांनी उपस्थितांशी संवाद साधला. बालकांवरील लैंगिक अत्याचारामागील मानसिकता, गुन्हेगारांची प्रवृत्ती तसेच बालकांच्या सुरक्षेबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. अनेकदा अशा घटना बालकांच्या परिचयातील व्यक्ती किंवा जवळच्या नातेवाईकांकडूनही घडू शकतात, त्यामुळे पालकांनी आणि समाजाने अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आत्मसंरक्षणाबाबत पीएलव्ही संगीता भामरे यांचे कौतुक कार्यक्रमादरम्यान न्यायमूर्ती देशमुख यांनी उपस्थित महिलांना त्यांच्या आत्मसंरक्षणाबाबत प्रश्न विचारला. “स्वतःच्या संरक्षणासाठी कोणती साधने जवळ ठेवता?” असा प्रश्न त्यांनी केला. त्यावर भुसावळ तालुका विधी सेवा प्राधिकरणाच्या पीएलव्ही संगीता राजेंद्र भामरे यांनी आत्मसंरक्षणासाठी आपल्याजवळ चिली स्प्रे असल्याचे सांगितले. त्यांच्या या उत्तराचे न्यायमूर्ती देशमुख यांनी कौतुक केले. त्यांनी भामरे यांना व्यासपीठावर बोलावून प्रेरणादायी सुविचारांचे पत्रक देत सत्कार करून अभिनंदन केले. संकटांना सामोरे जाणे, अपयशातून शिकणे आणि प्रतिकूल परिस्थितीतून सकारात्मक शिकवण घेणे यासंदर्भातील संदेश या पत्रकात देण्यात आले होते. यावेळी उपस्थित न्यायाधीश, पोलीस अधिकारी, वकील, पीएलव्ही आणि मान्यवरांनी टाळ्यांच्या कडकडाटात भामरे यांचे कौतुक केले. काही महिलांनीही आत्मसंरक्षणासाठी विविध साधने जवळ ठेवत असल्याचे सांगितले. त्यांच्या आत्मसंरक्षणाविषयीच्या जागरूकतेचेही कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी एन. एस. बुद्रुक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे जिल्हा सचिव यांनी उपस्थित मान्यवर, अधिकारी, वकील, पीएलव्ही आणि सहभागींचे आभार मानले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. हा परिसंवाद बालकांचे हक्क, POCSO कायदा, बालकांवरील अत्याचारापासून संरक्षण, महिलांचे आत्मसंरक्षण आणि बालकांच्या सुरक्षेतील पोलिसांची भूमिका याबाबत अत्यंत ज्ञानवर्धक, मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरला.


