जळगाव (प्रतिनिधी)- पत्रकार असल्याचे भासवून बंदी असलेले मांस बाळगल्याच्या आरोपावरून पोलिस कारवाई टाळण्यासाठी तब्बल पाच लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. कोमल बापुराव पाटील आणि जितेंद्र रूपसिंग चौधरी अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी रफीक कुरेशी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, “तुमच्याकडे बंदी असलेले मांस आहे. तुमच्याविरुद्ध पोलिस कारवाई टाळायची असल्यास आम्हाला पाच लाख रुपये द्या; अन्यथा कारवाईला सामोरे जा,” अशी धमकी देत दोघांनी पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. पाच लाख रुपये न मिळाल्यानंतर दोघांनी दिलेल्या माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पोलिस घटनास्थळी येण्यापूर्वीच दोघांनी रफीक कुरेशी यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केल्याची बाब समोर आली. पत्रकार असल्याचे भासवून नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाल्याने या प्रकरणाची शहरात चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणी रफीक कुरेशी यांच्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पीएसआय राजेंद्र उगले करीत आहेत.


