भुसावळ (प्रतिनिधी)- हतनूर धरण परिसरात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक वाढली असून, तापी नदीला मोठा पूर आला आहे.शुक्रवारी दि. ३१ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ वाजता धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्णतः उघडून तापी नदीपात्रात तब्बल ६,९५१ घनमीटर प्रति सेकंद अर्थात २ लाख ४५ हजार ४७५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.दरम्यान परिस्थिती नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी धरणावर भेट देऊन पाहणी केली
सध्या हतनूर धरणाची पाणीपातळी २११.१७० मीटर असून, धरणाची पूर्ण पाणीपातळी २१४.००० मीटर आहे. धरणातील एकूण पाणीसाठा २४२.८० दशलक्ष घनमीटर अर्थात ६२.५८ टक्के, तर उपयुक्त पाणीसाठा १०९.८० दशलक्ष घनमीटर अर्थात ४३.०६ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे.
धरणातून कालव्याद्वारे ५.६६ घनमीटर प्रति सेकंद अर्थात २०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून, आर.एस. गेटमधून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.
हतनूर धरण परिसरात आज ८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंतचा एकूण पाऊस २५८ मिलिमीटर इतका झाला आहे.
दरम्यान परिस्थिती नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी धरणावर भेट देऊन पाहणी केली. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने तापी नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.