सहकार नगरातील एकदंत अपार्टमेंटमध्ये चोरी; नीलकंठ अपार्टमेंटमध्येही घरफोडी, लाखोंच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला भुसावळ (प्रतिनिधी) | 23 जुलै 2026 : भुसावळ शहरातील सहकार नगर परिसरात बंद घरे हेरून चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. रेल्वेतील अभियंता राहुल सोपान तोमर यांच्या फ्लॅटमधून सुमारे ३८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच चांदीचे दागिने असा मुद्देमाल लंपास करण्यात आला. पोलिसांनी जुन्या बाजारभावानुसार चोरीचा ऐवज १ लाख ४ हजार रुपये इतका नोंदविला असला, तरी सध्याच्या बाजारभावानुसार त्याची किंमत सहा लाख रुपयांहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे. बंद घराची साधली संधी सहकार नगरातील एकदंत अपार्टमेंटमध्ये राहणारे रेल्वे अभियंता राहुल सोपान तोमर (वय ३६) हे कुटुंबासह गावी गेले होते. १८ ते २० जुलैदरम्यान फ्लॅट बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटातील ६ ग्रॅमची सोन्याची अंगठी, २५ ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्या, ४ ग्रॅमचे कानातले, ३ ग्रॅमची सोन्याची बाळी, तसेच चांदीचे पैंजण, ब्रासलेट आणि गळ्यातील चैन असा मौल्यवान ऐवज लंपास केला. नीलकंठ अपार्टमेंटमध्येही घरफोडी याच कालावधीत चोरट्यांनी सहकार नगरातील नीलकंठ अपार्टमेंटमधील जयगोविंदा लक्ष्मण पलई यांच्या फ्लॅटमध्येही घरफोडी केली. या घरातून नेमका किती आणि कोणता ऐवज चोरीला गेला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस तपास सुरू या दोन्ही घरफोडी प्रकरणांचा तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेडेड पोलीस उपनिरीक्षक अनिल सुरवाडे करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे.


