पडीक शेतात मानवी कवटी आढळल्याने खळबळ ;

फॉरेन्सिक तपासासाठी नमुने नाशिक व धुळे येथे रवाना; परिसरात बेकायदेशीर प्रकार घडत असल्याची चर्चा



नशिराबाद, ता. जळगाव : येथील महालक्ष्मी चौफुलीजवळील शिवारात पडीक शेतात मानवी कवटी आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डॉ. दिलीप चौधरी (रा. मुंबई) यांच्या मालकीच्या नशिराबाद शिवारातील गट क्रमांक ९८५ मधील शेतात ही कवटी आढळून आली. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक तपास सुरू केला असून, कवटी फॉरेन्सिक तपासणीसाठी नाशिक व धुळे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा नगरसेवक लालचंद पाटील यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात मानवी कवटी आढळल्याची माहिती दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून संपूर्ण शेताची तपासणी केली. कवटी ज्या ठिकाणी आढळून आली, त्या परिसरासह संपूर्ण शेतात इतर मानवी अवशेष, हाडे किंवा संशयास्पद वस्तू आढळतात का, याचा सखोल शोध घेण्यात आला. मात्र, मानवी कवटीव्यतिरिक्त अन्य कोणतेही अवशेष आढळून आले नसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले.

त्यानंतर पोलिसांनी संबंधित कवटी ताब्यात घेऊन पंचनामा केला. पुढील वैज्ञानिक तपासासाठी तिचे नमुने नाशिक व धुळे येथील फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर कवटी किती जुनी आहे, ती पुरुषाची की महिलेची आहे, तसेच तिची ओळख पटविण्याच्या दृष्टीने पुढील तपासाला दिशा मिळणार आहे.

दाट झाडीमुळे परिसरात बेकायदेशीर प्रकारांची चर्चा

दरम्यान, ज्या शेतात कवटी आढळून आली ते शेत अनेक वर्षांपासून पडीक आहे. या शेतात मोठ्या प्रमाणात बाभळीची झाडे वाढली असून संपूर्ण परिसर दाट झाडीने व्यापलेला आहे. त्यामुळे या परिसरात विविध बेकायदेशीर प्रकार घडत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. संबंधित शेतातील बाभळीची झाडे तातडीने हटविण्यात यावीत, अशी मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.

मानवी कवटी नेमकी कोणाची आहे? संबंधित व्यक्तीसोबत नेमके काय घडले? कवटी त्या ठिकाणी कशी आली? हा प्रकार जुना आहे की अलीकडील? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. त्यामुळे या घटनेमुळे परिसरात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी सांगितले की, घटनेचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. फॉरेन्सिक प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील तपासाला अधिक वेग येईल. या प्रकरणाचा अधिक तपास नशिराबाद पोलिस करीत आहेत.