भुसावळात मध्यरात्री अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर जप्त; ५.१२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

भुसावळ ( प्रतिनिधी ): शहरात अवैध गौण खनिज (वाळू) वाहतुकीविरुद्ध बाजारपेठ पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत सुमारे ५ लाख १२ हजार रुपयांचा डंपर व वाळूचा साठा जप्त केला. ही कारवाई १७ जुलै रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास जामनेर रोडवरील हॉटेल प्रिमीअर प्राईड परिसरात करण्यात आली. या प्रकरणी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांना नाहाटा चौकातून जामनेर रोडवरील हॉटेल प्रिमीअर प्राईड परिसरातून पिवळ्या रंगाच्या डंपरमधून अवैधरीत्या वाळूची वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या आदेशाने विशेष पथकाने १७ जुलै रोजी रात्री सापळा रचला.

रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास संशयित डंपर येताना दिसताच पोलिसांनी तो थांबवून चालकाची चौकशी केली. चालकाने आपले नाव कुंदन मंगल कोळी (वय २०, रा. पंचमुखी हनुमान नगर, साकेगाव, ता. भुसावळ) असे सांगितले. डंपरची तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे तीन ब्रास गौण खनिज वाळू आढळून आली.

वाळू वाहतुकीसंदर्भातील शासकीय पास किंवा परवाना मागितला असता चालकाकडे कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी अंदाजे ५ लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड कंपनीचा डंपर आणि सुमारे १२ हजार रुपये किमतीची वाळू, असा एकूण ५ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल संकेत झांबरे, विजय नेरकर, पोलीस कॉन्स्टेबल भूषण चौधरी, दिलीप कोल्हे तसेच एएसआय सुनील सोनवणे यांनी सहभाग घेतला. पंचांसमक्ष पंचनामा करून डंपर व चालकाला ताब्यात घेण्यात आले.

याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल संकेत अरुण झांबरे यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात कुंदन मंगल कोळी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.