भुसावळ (प्रतिनिधी)-: येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शुक्रवारी सकाळी ११ वाजता शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहन चालकांसाठी एका विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात भुसावळ वाहतूक शाखेच्या वतीने वाहन चालकांना सुरक्षित वाहतुकीचे नियम समजावून सांगण्यात आले.विद्यार्थ्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असल्याने, शाळेत धावणाऱ्या रिक्षा, व्हॅन आणि बस चालकांना भुसावळ वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे व कॉन्स्टेबल प्रशांत चव्हाण यांनी महत्त्वाच्या टिप्स दिल्या. रस्त्यावरील वाहतुकीचे नियम पाळणे, वाहनांची गती मर्यादित ठेवणे, आणि क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना वाहनात न बसवणे याविषयी कायदेशीर व सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी स्कुलच्या प्रिन्सिपल निना कटलर यांनीही उपस्थित रिक्षा व बस चालकांशी संवाद साधला. मुलांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी सर्वस्वी चालकांवर असते, त्यामुळे वाहन चालवताना कोणतीही घाईगडबड न करता खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. या महत्त्वपूर्ण मार्गदर्शन शिबिराप्रसंगी ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्रिंसिपल निना कटलर,शिरीष झांबरे आणि मोठ्या संख्येने शालेय वाहन चालक उपस्थित होते. फोटो कॅप्शन - भुसावळ येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वाहनधारकांना व चालकांना मार्गदर्शन करताना वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे सोबत प्रिन्सिपल निना कटलर,प्रशांत चव्हाण आदी.


