भुसावळातील श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानात १४ ते १६ जुलैदरम्यान २९ वा ब्रह्मोत्सव; भव्य शोभायात्रा व महाप्रसादाचे आयोजन

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानात दरवर्षीप्रमाणे यंदाही मंगळवार, दि. १४ जुलै ते गुरुवार, दि. १६ जुलै या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी युक्त २९ व्या ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. व्यंकटेश चॅरिटेबल ट्रस्ट व श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे.

या ब्रह्मोत्सवात भाविकांना प्रेरणादायी मार्गदर्शन करणारे स्वामी श्री केशवाचार्यजी महाराज तसेच आशीर्वाद देणारे परमपूज्य युवराज स्वामीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

धार्मिक कार्यक्रमांची रूपरेषा

दि. १४ जुलै (मंगळवार) रोजी सकाळी ७ वाजता मंदिर प्रवेश, श्री व्यंकटेश देव व पद्मावती माता यांचे पूजन व महाअभिषेक, प्रथम पाठ, आरती आदी धार्मिक विधी पार पडतील. सायंकाळी देवी-देवतांची पालखी काढण्यात येईल.

दि. १५ जुलै (बुधवार) रोजी श्री रामानुजन स्वामीजी व गोदंबाजी यांचा अभिषेक, हवन, पूजन, आरती तसेच श्री व्यंकटेश स्तोत्र पठण होईल. सायंकाळी ५.१५ वाजता मंदिर परिसरातून देवी-देवतांची पालखी मिरवणूक निघेल.

दि. १६ जुलै (गुरुवार) रोजी सकाळी श्रीदेवी, भूदेवीसह श्री व्यंकटेश देवांचा महाअभिषेक, प्रबंध पाठ व आरती होईल. दुपारी १२ वाजता ब्रह्मोत्सवाची पूर्णाहुती संपन्न होईल.

भव्य शोभायात्रा व महाप्रसाद

गुरुवार, दि. १६ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजता श्री लक्ष्मी व्यंकटेश देवी-देवतांची वाजतगाजत भव्य शोभायात्रा (नगर प्रदक्षिणा) काढण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता आरती व महाप्रसाद वाटपाने ब्रह्मोत्सवाची सांगता होणार आहे.

या सर्व धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी तसेच ब्रिजमोहन अग्रवाल, मिलिंद अग्रवाल, रामवल्लभ झवर, जे. बी. कोटेचा, राजेश चांडक, मधूलता शर्मा, दीपक काबरा आणि गोपाल राठोड यांनी केले आहे.