भुसावळ (प्रतिनिधी) : येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध रंगांचे रेनकोट परिधान करून आकर्षक 'मानवी इंद्रधनुष्य' साकारत उपस्थितांची मने जिंकली. या उपक्रमात प्राथमिक विभागातील सुमारे ३०० ते ४०० विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग घेत मैदानावर इंद्रधनुष्याची मनोहारी प्रतिकृती उभी केली. रंगीबेरंगी रेनकोट परिधान केलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांमुळे संपूर्ण परिसर रंगांनी नटला होता. या अनोख्या सादरीकरणासोबत विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सामूहिक नृत्यही सादर केले. त्यांच्या तालबद्ध सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. यावेळी शाळेच्या प्राचार्या नीना कटलर यांनी विद्यार्थ्यांना इंद्रधनुष्याचे सात रंग, त्यांचे महत्त्व आणि निसर्गातील त्याची निर्मिती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी उत्सुकता, सर्जनशीलता, शिस्त आणि सांघिक भावना विकसित करण्याचा संदेश देण्यात आला. या उपक्रमात प्राचार्या नीना कटलर, उपप्राचार्या श्रद्धाली घुले तसेच मनप्रीत कौर, अनिता कोळी, अनघा पाटील, हर्षला पाटील, मनीषा कीरंगे, अँनेट मॅथ्यू, आकाश परदेशी, विजय संकत आणि शाळेतील शिक्षक-विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. लहान विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या कल्पक, रंगतदार आणि शिस्तबद्ध 'मानवी इंद्रधनुष्य' उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


