मध्य रेल्वेचे प्रवाशांना आवाहन : अधिकृत प्लॅटफॉर्मवरूनच ट्रेनमध्ये चढा-उतरा; अनधिकृत प्रवेशावर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आवाहन करत, केवळ स्थानकावरील अधिकृत प्लॅटफॉर्मवरूनच ट्रेनमध्ये चढावे व उतरावे, असे स्पष्ट केले आहे. यार्ड, कार शेड, सिग्नल किंवा इतर अनधिकृत ठिकाणांहून ट्रेनमध्ये चढणे-उतरणे टाळावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

मध्य रेल्वेच्या निदर्शनास आले आहे की, दररोज सकाळी ८.०० ते ८.३० या वेळेत कळवा कार शेडमधून सुटणारी उपनगरी (लोकल) रिकामी गाडी मुख्य प्रवेशद्वाराजवळील केबिन परिसरात सिग्नलमुळे थांबल्यानंतर काही प्रवासी अनधिकृतपणे गेटमधून आत प्रवेश करून सिग्नलजवळच ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात.

रेल्वे प्रशासनाने या प्रकाराला अत्यंत धोकादायक ठरवत इशारा दिला आहे. सिग्नल मिळाल्यानंतर ट्रेन अचानक सुरू झाल्यास गंभीर अपघात होऊन जीवितहानी किंवा गंभीर दुखापत होण्याची शक्यता असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून संबंधित गेट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विविध सुरक्षा निकषांचा विचार करून सिग्नलवर ट्रेन थांबण्याची गरज टाळण्यासाठीही उपाययोजना करण्यात येत आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी संबंधित ठिकाणी रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे की, कार शेड किंवा प्रवाशांसाठी अधिकृत नसलेल्या ठिकाणांहून रिकाम्या ट्रेनमध्ये चढणे किंवा उतरणे हा रेल्वे कायद्यानुसार दंडनीय गुन्हा आहे. अशा प्रकारे अनधिकृत प्रवेश करणाऱ्या अथवा ट्रेनमध्ये चढणाऱ्या-उतरणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे की, स्वतःच्या सुरक्षिततेसाठी केवळ अधिकृत प्लॅटफॉर्मचाच वापर करावा, रेल्वेच्या सर्व सुरक्षा सूचनांचे पालन करावे आणि रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.

कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी प्रवाशांनी रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १३९ वर संपर्क साधावा किंवा जवळच्या कर्तव्यावरील रेल्वे कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी.