भुसावळ ( प्रतिनिधी )- भुसावळ नगरपालिकेच्या कार्यालयातील विविध दालनांमध्ये बसविण्यात आलेल्या वातानुकूलित यंत्रणा (AC) संदर्भातील माहिती मिळविण्यासाठी माहिती अधिकार कायदा, 2005 अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या अर्जाला अपूर्ण उत्तर मिळाल्याचा आरोप अर्जदार प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी केला आहे. यामुळे त्यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार प्रथम अपील दाखल केले असून, या प्रकरणाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. माहिती अधिकार अर्जाद्वारे अर्जदारांनी AC बसविण्यासाठी आवश्यक प्रशासकीय मंजुरी, तांत्रिक मान्यता, झालेला खर्च, संबंधित अधिकाऱ्यांचे वेतन स्तर, मागील दोन वर्षांचे वीज बिल तसेच AC बसविल्यानंतर वाढलेल्या अतिरिक्त वीज भार (Electrical Load) याबाबतची माहिती मागितली होती. नगरपालिकेकडून देण्यात आलेल्या उत्तरामध्ये काही वीज बिलांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, AC मुळे वीज भारात किती वाढ झाली, याबाबत कोणताही तपशील देण्यात आला नसल्याचा दावा अर्जदारांनी केला आहे. तसेच Electrical PWD ची तांत्रिक मान्यता, विशेष परवानगी आणि इतर संबंधित कागदपत्रांबाबत "माहिती उपलब्ध नाही" असे उत्तर देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. या उत्तरावर समाधान न झाल्याने प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी 9 जुलै 2026 रोजी माहिती अधिकार कायद्यानुसार प्रथम अपील दाखल केले असून, अपील प्राधिकरणाकडे संपूर्ण, अचूक व प्रमाणित माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात प्रथम अपील प्राधिकरण काय निर्णय घेते, तसेच नगरपालिकेला मागितलेली माहिती उपलब्ध करून देण्याचे निर्देश देते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


