मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात जून २०२६ दरम्यान व्यापक रेल्वे संरक्षा जनजागृती अभियान; १,१२२ कर्मचाऱ्यांचा सहभाग

भुसावळ (प्रतिनिधी) - मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात रेल्वे संचालन अधिक सुरक्षित, सतर्क आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशाने जून २०२६ महिन्यात व्यापक रेल्वे संरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत विभागातील विविध यार्ड, डेपो तसेच समपातळी रेल्वे फाटकांवर (लेव्हल क्रॉसिंग गेट) एकूण २९ संरक्षा परिसंवाद, संरक्षा बैठका आणि शंटिंग मेळ्यांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमध्ये १,१२२ रेल्वे कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

संरक्षा अधिकारी आणि संरक्षा समुपदेशक (Safety Counsellors) यांनी कर्मचारी तसेच रस्ता वापरकर्त्यांना सुरक्षित कार्यपद्धती, सतर्कता, नियमांचे काटेकोर पालन आणि अपघात प्रतिबंध याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यामुळे रेल्वे सुरक्षेबाबत जागरूकता वाढविण्यास आणि सुरक्षित कार्यसंस्कृती मजबूत करण्यास मदत झाली.

याशिवाय, रेल्वे संचालनादरम्यान घडलेल्या असामान्य घटनांवर आधारित व्हिडिओ-आधारित समुपदेशन सत्रांचे आयोजन परिवहन निरीक्षक (TI) आणि स्टेशन व्यवस्थापक (SM) यांनी केले. या सत्रांमध्ये प्रत्यक्ष घटनांचे विश्लेषण करून परिचालन कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि दक्ष कार्यपद्धती अवलंबण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

संरक्षा जनजागृती अधिक प्रभावी आणि सहभागात्मक करण्यासाठी भुसावळ विभागातील सर्व स्थानकांवर 'इंटरॅक्टिव्ह सेफ्टी पोस्टर समुपदेशन' हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक स्थानकावर इंटरॅक्टिव्ह संरक्षा पोस्टरयुक्त सेफ्टी फोल्डर तयार करून त्यांची नियमित नोंद व देखभाल केली जात आहे. या फोल्डरचा वापर परिचालन कर्मचाऱ्यांच्या नियमित समुपदेशनासाठी, संरक्षा जनजागृती वाढविण्यासाठी आणि सुरक्षित कार्यसंस्कृती अधिक बळकट करण्यासाठी केला जात आहे.

भुसावळ विभाग सातत्यपूर्ण प्रशिक्षण, प्रभावी समुपदेशन आणि जनजागृती कार्यक्रमांच्या माध्यमातून सुरक्षा संस्कृती अधिक दृढ करण्यासाठी कटिबद्ध असून, प्रवासी, रेल्वे कर्मचारी आणि रस्ता वापरकर्त्यांसाठी सुरक्षित, संरक्षित आणि विश्वासार्ह रेल्वे संचालन सुनिश्चित करणे हे विभागाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.