हरित भविष्यासाठी सक्षम नारी फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम; साकेगावच्या इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

भुसावळ (प्रतिनिधी) | दि. ११ जुलै २०२६

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हरित भविष्यासाठी सक्षम नारी फाउंडेशन, भुसावळ यांच्या वतीने साकेगाव येथील इंदिरा गांधी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात शनिवारी (दि. ११) वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. विविध वृक्षांची लागवड करून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली.

या उपक्रमास सक्षम नारी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुवर्णा गाडेकर, शाळा समितीचे सचिव वामन कचरे, मुख्याध्यापिका सौ. आर. टी. आटाळे, मुख्याध्यापक श्री. डीगंबर सर, सौ. सुषमा नेमाडे मॅडम, पांडुरंग कोळी तसेच फाउंडेशनच्या महिला पदाधिकारी, सदस्य आणि विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. सुवर्णा गाडेकर यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे महत्त्व अधोरेखित केले. कोरोनाकाळात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती, बदलते हवामान, अनियमित पाऊस आणि वन्यजीवांवर होणारे दुष्परिणाम यांचा उल्लेख करत त्यांनी प्रत्येकाने वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे आवाहन केले.

"केवळ झाडे लावून थांबणे पुरेसे नाही, तर ती जगविणे आणि त्यांचे योग्य संगोपन करणे हीच खरी पर्यावरणसेवा आहे," असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असून समाजातील प्रत्येक घटकाने यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.    

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सक्षम नारी फाउंडेशनच्या सुनीता जोशी, वंदना कांबळे, संघमित्रा ढाकणे, उज्वला बागुल, गायत्री विसपुते आणि शीतल भालेराव यांचेसह 
 आर. एन. पाटील सर, निळे सर, एम. आर. पाटील (भाऊसाहेब), पांडुरंग कोळी, सुनील दादा यांनी विशेष परिश्रम घेतले.  यावेळी शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.