भुसावळात पुन्हा मोकाट कुत्र्यांचा उच्छाद; दोन दिवसांत चार ठिकाणी हल्ले, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण :


भुसावळ (प्रतिनिधी) | दि. ११ जुलै २०२६

भुसावळ शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी नारायणनगर परिसरात मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात तारकेश विशाल झोपे या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर शहरभर संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर नगरपालिकेने मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी विशेष मोहीम सुरू केल्याचा दावा केला होता. काही भागांत कंत्राटी पद्धतीने कुत्रे पकडण्याची कारवाईही करण्यात आली. मात्र, सुरुवातीच्या काही दिवसांनंतर ही मोहीम मंदावल्याचे दिसून येत असून पुन्हा शहरातील विविध भागांत श्वानदंशाच्या घटना वाढू लागल्या आहेत.

गेल्या दोन दिवसांत शहरातील चारपेक्षा अधिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. चार दिवसांपूर्वी सिंधी कॉलनी परिसरात एका मोकाट कुत्र्याने भाऊ-बहिणीवर हल्ला करून त्यांना चावा घेतला होता. त्यानंतर शुक्रवार (१० जुलै) रोजी देना नगर, गोविंद कॉलनी, कस्तुरी नगर आणि नेब कॉलनी परिसरातही मोकाट कुत्र्यांचा हैदोस पाहायला मिळाला.

या हल्ल्यांमध्ये एका बालकाच्या कानाला कुत्र्याने चावा घेतल्याची गंभीर घटना घडली असून मुक्तानंद कॉलनी, काशीविश्वनाथ मंदिर परिसर तसेच देना नगर भागातही श्वानदंशाच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत.

सतत घडणाऱ्या या घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना मोकाट कुत्र्यांचा मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेक भागांत कुत्र्यांचे कळप रस्त्यावर मुक्तपणे फिरत असल्याने वाहनचालकांनाही अपघाताचा धोका वाढला आहे.

दरम्यान, नगरपालिकेकडून मोकाट कुत्र्यांवर नियंत्रणासाठी मोहीम सुरू असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात हल्ल्यांच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांनी या मोहिमेच्या प्रभावीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सुरुवातीची कारवाई केवळ दिखावा ठरल्याची भावना नागरिक व्यक्त करत असून सातत्याने आणि प्रभावी उपाययोजना न झाल्यामुळे परिस्थिती पुन्हा पूर्ववत झाल्याचे चित्र दिसत आहे.

शहरातील वाढत्या श्वानदंशाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मोकाट कुत्र्यांना तातडीने पकडण्यासाठी विशेष मोहीम पुन्हा वेगाने राबवावी, धोकादायक भागांमध्ये विशेष पथके तैनात करावीत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.