जळगावात एलसीबी-जिल्हापेठ पोलिसांची संयुक्त धडक कारवाई; ५६.२९ ग्रॅम एमडी जप्त, दोघांना अटक; ३.०६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत :

जळगाव ( प्रतिनिधी )- 
जळगाव शहरात अंमली पदार्थांच्या अवैध विक्री व वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि जिल्हापेठ पोलिसांनी संयुक्तपणे मोठी कारवाई करत ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ जप्त केला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, ३ लाख ६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी "नशामुक्त भारत" अभियानांतर्गत जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली.

१० जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे २.३५ वाजता गुप्त माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यामागील शासकीय तांत्रिक विद्यालयाशेजारी असलेल्या जी.एस. ग्राऊंडच्या प्रवेशद्वाराजवळ सापळा रचण्यात आला. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या तिघांना अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यापैकी एक संशयित अंधाराचा फायदा घेत पसार झाला, तर उर्वरित दोघांना ताब्यात घेण्यात आले.

तपासणीदरम्यान आरोपींकडून ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले. तसेच २ लाख ८१ हजार ५४० रुपयांचा एमडी आणि २५ हजार रुपयांची हिरो स्प्लेंडर (MH-19-DJ-0132) मोटारसायकल असा एकूण ३ लाख ६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे जयेश देविदास तायडे (वय २७, रा. हरी ओम नगर, जळगाव) आणि हितेंद्र शिवाजी परदेशी (वय ३१, रा. कांचन नगर, जळगाव) अशी आहेत. प्राथमिक चौकशीत दोघांनी फरार आरोपी भैय्या सोनवणे (रा. कांचन नगर, जळगाव)  विक्रीसाठी मेफेड्रोन घेतल्याची कबुली दिली असून, त्याचा शोध सुरू आहे.

दरम्यान, आरोपी जयेश तायडे याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा, गंभीर दुखापत आणि दरोडा अशा स्वरूपाचे चार गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ०२१७/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा, १९८५ मधील कलम ८(क), २२(क) व २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखा व जिल्हापेठ पोलीस पथकाने केली.